कोल्हापूर : माजी महापौर व तपोवन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप गणपतराव मगदूम (वय ६० रा. जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर बसस्थानक) यांचे मंगळवारी सकाळी पावणेसात वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. उत्तम जनसंपर्क, अभ्यासू नगरसेवक व शहराच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व त्यांच्या निधनाने हरपले. दुपारी पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सून, दोन बहिणी व दोन भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी सकाळी दहा वाजता आहे. मगदूम हे १९९० ते २००५ पर्यंत सलग १५ वर्षे तपोवन प्रभागातून निवडून आले. २००२ ला ते महापौर झाले. महापौर झाल्यानंतर आपण आमदार होऊ, असा विश्वास त्यांना होता; परंतु तपोवन पतसंस्थेबद्दलच्या तक्रारी सुरू झाल्यावर त्यांची कारकीर्द झाकोळली. गेली दहा वर्षे त्यांना मानसिक व शारीरिकही त्रास होता. त्यातच ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त होती त्यामुळे व्याधी व अन्य संकटांमुळे ते डगमगले नाहीत. उजव्या पायाच्या अंगठ्याची जखम फारच बळावल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथूनही ते महापालिकेच्या निवडणुकीतील घडामोडींची माहिती करून घेत असत. गेल्या तीन दिवसांत त्यांचा त्रास वाढला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. हे वृत्त समजताच सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी रुग्णालयात जाऊन दोन्ही मुलांना धीर दिला. खासदार धनंजय महाडिक, आमदार महादेवराव महाडिक यांनी निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. साडेदहा वाजता फुलांनी सजविलेल्या ट्रॉलीत पार्थिव ठेवून अंत्ययात्रा सुरू झाली. महापालिकेसमोर अंत्ययात्रा आल्यावर महापौर वैशाली डकरे व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी पुष्पहार वाहून श्रद्धांजली वाहिली व महापालिकेस सुटी दिली. मगदूम यांनी ‘महापौर आपल्या दारी’ ही संकल्पना राबवली होती. फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्यातही त्यांचा पुढाकार होता, अशा शब्दांत महापौरांनी मगदूम यांच्या कार्याचे मोठेपण सांगितले. यावेळी गटनेता राजेश लाटकर यांचेही भाषण झाले.दुपारी साडेबारा वाजता मगदूम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. येथील शोकसभेत सतेज पाटील, आर. के. पोवार, राजेश लाटकर व दत्ता टिपुगडे यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी महापौर बाजीराव चव्हाण, सुनील कदम, नंदकुमार वळंजू, भाजपचे महेश जाधव, बाळासाहेब साळोखे, विक्रम जरग, सुनील मोदी, अनंत खासबारदार, दिलीप शेटे, जितू पाटील, दिलीप टिपुगडे, शारंगधर देशमुख, वसंतराव देशमुख, महेश धर्माधिकारी, नंदकुमार मोरे, अजित राऊत, सुभाष रामुगडे, दत्ता बामणे, महेश सावंत, किसन कल्याणकर, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)सामान्य विक्रेत्याचा मुलगा...मगदूम यांचे मूळ गाव नंदगाव (ता. करवीर). त्यांचे वडील नोकरीनिमित्त कोल्हापुरात आले. ते फिरते चहा विक्रेते होते. त्यांच्या वडिलांचे निधन गेल्या दोन महिन्यांपूर्वी झाले. त्यानंतर तेही खचले होते.
माजी महापौर दिलीप मगदूम यांचे निधन
By admin | Published: September 29, 2015 11:47 PM