लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी महापौर व ज्येष्ठ पत्रकार विलासराव माधवराव सासने (वय ८३) यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. गतवर्षी कोविड झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले होते, त्यातून पूर्ण बरे होऊन घरी परतले होते, मात्र पुन्हा एकदा त्यांना काेविडनेच गाठले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
शिवाजी पेठेचे तसेच पत्रकार म्हणून झालेले विलासराव पहिलेच महापौर होत. त्यांनी उमेदीच्या काळात पत्रकार म्हणून काम केले. ‘इंद्रधनुष्य’ या दैनिकातून त्यांनी विविध सामाजिक विषयांवर तसेच समस्यांवर लिखाण केले होते. पत्रकारिता करीत असताना १९७८ साली नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. त्यानंतर झालेली महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक त्यांनी लढविली. पहिल्याच प्रयत्नात शिवाजी पेठेतील प्रभागातून ते विजयी झाले. १९७८ ते १९८४ या काळात त्यांनी महापालिका सभागृहातील कामकाजावर चांगलाच प्रभाव पाडला. दि. २० ऑगस्ट १९८२ रोजी सहावे महापौर म्हणून त्यांची निवड झाली. महापौर पदालाही त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूर शहराची थेट पाईपलाईन योजना आता पूर्णत्वाकडे चालली आहे, अशी योजना राबविण्याची मूळ संकल्पना विलासराव सासने यांनी मांडली. त्यानंतर या योजनेसाठी शिवाजी पेठेतून आंदोलनाला सुरुवात झाली, त्यातही विलासराव आघाडीवर राहिले. रेल्वे स्थानकासमोरील रस्ता रुंदीकरणात जात असणारे मारुती मंदिर रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थानकाच्या परिसरात त्याची उभारणी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. जोतिबा रोडवरील संत गाडगे महाराज यांचा पुतळा उभारण्यातही त्यांनी योगदान दिले.
कोल्हापुरातील पत्रकारांच्या गृह प्रकल्पासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या पुढाकारातून बाबर हॉस्पिटल परिसरात जुन्या काळातील पत्रकारांना पत्रकार गृह निर्माण सोसायटीच्या माध्यमातून जागा मिळवून दिली. माजी महापौर संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. माजी महापौरांना निवृत्ती वेतन मिळावे, म्हणून त्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र संघटितपणाच्या अभावामुळे त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले नाही.
फोटो - २१०६०६२०२१-कोल-विलासराव सासने