महाराष्ट्र यांना कंटाळलाय, काँग्रेसचे बारा वाजवा; माजी मंत्री पंकजा मुंडेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 11:05 AM2022-04-07T11:05:46+5:302022-04-07T11:06:23+5:30
या सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजबिलाचा प्रश्न, महिलांचे प्रश्न सोडवले नाहीत. ज्या मराठा समाजाच्या जीवावर इतकी वर्षें राज्य केले त्या समाजाला दिलेले आरक्षण घालवले. त्यामुळे कधी एकदा हे सरकार बदलतंय म्हणून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक देव पाण्यात घालून बसले आहेत.
कोल्हापूर : केवळ आपल्या पक्षांच्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. संपूर्ण महाराष्ट्र यांना कंटाळलाय. कोल्हापूरकरांना चांगली संधी आली आहे. तेव्हा १२ तारखेला काँग्रेसचे १२ वाजवा, असे आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
कोल्हापूर उत्तरचे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ बुधवारी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार सिध्दार्थ शिराळे, विक्रांत पाटील, शौमिका महाडिक, नीता केळकर, उमाताई खापरे उपस्थित होत्या.
मुंडे म्हणाल्या, या सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजबिलाचा प्रश्न, महिलांचे प्रश्न सोडवले नाहीत. ज्या मराठा समाजाच्या जीवावर इतकी वर्षें राज्य केले त्या समाजाला दिलेले आरक्षण घालवले, इतर मागास समाजाचे राजकीय आरक्षण असुरक्षित करण्याचे पाप यांनी केले. त्यामुळे कधी एकदा हे सरकार बदलतंय म्हणून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक देव पाण्यात घालून बसले आहेत.
कोल्हापूरच्या जनतेवर टोल बसू नये म्हणून चंद्रकांत पाटील यांनी आग्रह करून देवेेंद्र फडणवीस यांच्याकडून टोल माफ करून घेतला याची मी साक्षीदार आहे. महिलांना गॅस, जनधन खाती, कोरोना काळात खात्यात पैसे, बेटी बचाव, बेटी पढाओ गरीब आणि महिलांसाठीच्या या सर्व योजना नरेंद्र मोदी यांनी सुरू केल्या.
समरजित घाटगे म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच खरी जातीयवादी आहे. म्हणूनच त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही. संभाजीराजेंनी केलेल्या मागण्या मान्य केल्या नाहीत. आण्णासाहेब पाटील महामंडळासाठी निधी दिला नाही.
सत्यजित कदम म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालय पुराच्या पाण्याखाली गेल्यानंतर तरी मंत्री जागे होतील. ई वॉर्डात पाणी येणार नाही यासाठी मीटिंग घेतील असे वाटले होते. परंतु यातील काही झाले नाही. कोल्हापुरात ना महिलांसाठी स्वच्छतागृहे झाली. ना थेट पाइपलाइन झाली.
सुनील देवधर म्हणाले, साधूंची हत्या करणाऱ्यांना पाठीशी घालणारे, हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसणारे, नवाब मलिक यांची पाठराखण करणारे हे ठाकरे, पवार यांचे हे सरकार हिंदूविरोधी आहे. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, विजय जाधव, महेश जाधव यांची भाषणे झाली. गणेश देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
शिवसैनिकांनी कुणाकडे पाहायचं
मुंडे म्हणाल्या, मला अशी माहिती मिळाली की, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु या निवडणुकीत त्यांचा उमेदवारच नाही. गेली ३०/३५ वर्षे शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांनी कोणाकडे पाहायचं. त्यांच्यामध्ये मोठी नाराजी आहे.