कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ घेऊनच महायुतीचा उमेदवार म्हणून करवीर विधानसभेच्या रिंगणात उतणार असल्याची घोषणा माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी रविवारी केली.पंचमहाभूत लोकोत्सव महाआरतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात आले असता, त्यांच्या स्वागतासाठी गंगावेश येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.शिवसेनेच्या फुटीनंतर चंद्रदीप नरके यांची कोंडी झाली होती. ते मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेना मंत्र्यांच्या संपर्कात होते. रविवारी त्यांनी करवीर, पन्हाळ्यातील समर्थकांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी गंगावेश येथे बोलावले हाेते. दुपारी तीन वाजल्यापासून समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे आल्यानंतर चंद्रदीप नरके यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.चंद्रदीप नरके म्हणाले, विधानसभेतील पराभवानंतर पाचव्या दिवसापासून मतदारसंघात संपर्क सुरू ठेवला. सामान्य माणसांसाठी आक्रमक काम करीत आहे. यापूर्वी महायुतीचा मी आमदार होतो, आताही शिवसेना-भाजप युतीचाच आहे. आगामी विधानसभेला मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण घेऊनच रिंगणात उतरणार आहे. यावेळी कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, गोकुळचे संचालक एस. आर. पाटील, कुंभीचे संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठरलं! धनुष्यबाण घेऊनच चंद्रदीप नरके ‘करवीर’च्या रिंगणात, जोरदार शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 11:15 AM