कोल्हापूर : गेले अनेकवर्षे शिवसेना पक्षापासून अलिप्त राहिलेले माजी आमदार सुरेश बळवंतराव साळोखे हे १५ वर्षांनंतर पुन्हा स्वगृही परतले. बुधवारी दुपारी मुंबईत ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी पक्षप्रवेश केला. यापूर्वी कोल्हापूर शहरातून दोनवेळा शिवसेनेच्या तिकिटावर ते आमदार झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रवेश हा पक्षाला बळ देणारा ठरणारा आहे.माजी आमदार सुरेश साळोखे यांनी सन १९९५ आणि सन १९९९ अशी दोनवेळा आमदार म्हणून विजयी झाले; पण त्यानंतर ते शिवसेनेपासून अलिप्त राहिले होते. विशेष म्हणजे, कोल्हापुरात कपिलतीर्थ मार्केट येथे शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवण्यात त्यांचा प्रमुख पुढाकार होता. त्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोल्हापुरात आले होते.सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते शिवसेनेपासून अलिप्त राहिले होते. त्यानंतर त्यांनी मनसे पक्षाच्यावतीने विधानसभेची निवडणूक लढविली होती; पण बदलत्या राजकिय परिस्थितीत गेल्या वर्षभरात त्यांची शिवसेनेशी जवळीक वाढली होती. बुधवारी त्यांनी मुंबईत ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, माजी अध्यक्ष रवी चौगुले, अनिल साळोखे, युवा सेनेचे संघटक अवधूत साळोखे, आप्पा पुणेकर, रवी साळोखे, सुनील शिंत्रे हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पक्षप्रमुख ठाकरे यांनी, त्यांना शिवसेनेची जबाबदारी घ्या, लोकसभेचा खासदार हा शिवसेनेचा झाला पाहिजे, त्यासाठी झटून काम करा, असा सल्ला साळोखे यांना दिला.