लोकमत न्यूज नेटवर्कशिरटे : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील माजी खासदार व राजारामबापू सहकारी दूध संघाचे संस्थापक-अध्यक्ष अॅड. विश्वासराव तथा विश्वासदाजी रामराव पाटील (वय ८३) यांचे गुरुवारी (दि. १५) अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार विश्वासदाजी पाटील यांची राजकीय कारकीर्द १९६०च्या दरम्यान सुरू झाली. काँग्रेसचे तालुका, जिल्हा चिटणीसपदासह उपाध्यक्षपद सांभाळल्यानंतर १९७०च्या दरम्यान त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला. १९७२ मध्ये राजारामबापू पाटील यांच्यामुळे ते जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले. पुढे ११ वर्षे ते जिल्हाध्यक्ष होते. नंतर जनता पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष व राष्ट्रीय सरचिटणीस अशी पदेही त्यांनी भूषविली. १९८० मध्ये वसंतदादा पाटील, १९८३ मध्ये शालिनीताई पाटील व १९८५ मध्ये प्रकाशबापू पाटील यांच्याविरोधात विश्वासदाजी पाटील यांनी सांगली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. पुढे पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात ते कऱ्हाडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. परंतु कोणत्यात निवडणुकीत त्यांना यश आले नाही. मात्र १९८८ ते ९३ या काळात जनता पक्षाने त्यांना राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली. इस्लामपूर येथील राजारामबापू दूध संघाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. दूध संघाच्या स्थापनेपासून सलग १३ वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषविले.त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, राजारामबापू दूध संघाचे माजी संचालक व राजारामबापू पाटील बँकेचे संचालक अॅड. संग्राम पाटील आणि प्रसाद ही दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन विधी शनिवार, दि. १७ रोजी येडेमच्छिंद्र येथे होणार आहे.विश्वासदाजी पाटील यांचा मृतदेह कऱ्हाड येथून सायंकाळी पाच वाजता येडेमच्छिंद्र येथे आणण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. दाजींच्या निधनाचे वृत्त समजताच येडेमच्छिंद्र येथील शाळांना सुटी देण्यात आली. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.सायंकाळी सात वाजता मुलांनी मुखान्नी दिला.
माजी खासदार विश्वासदाजी पाटील यांचे निधन
By admin | Published: June 15, 2017 11:44 PM