कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीत महादेवराव महाडिक यांना पाठिंबा देणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी विधानपरिषदेसाठी सतेज पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी झालेल्या मेळाव्यामध्ये शेट्टी यांनी उपस्थिती दर्शवत सतेज पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे मत व्यक्त केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांचे गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीचे सूर जुळत नसल्याचे चित्र दिसत होते. पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी त्यांनी आक्रोश पदयात्रा काढत सरकारला धारेवर धरले होते. मात्र त्यांचा सरकारवरील नाराजीचा सूर आता कमी झाल्याचे दिसत आहे. नाराजीच्या या सर्व चर्चेला फाटा देत त्यांनी आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून या ठिकाणी मेळाव्यास उपस्थित असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडीचा एक घटकपक्ष म्हणून मी उपस्थित आहे. विजयाची खात्री आहे. परंतू पालकमंत्री पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याकडून अपेक्षाही आहेत. पूरग्रस्त तुमच्यावर नाराज आहेत. त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. पीक विम्याचे पैसेही मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांशी निगडीत अजूनही प्रश्न आहेत. अजून काम करायला वाव आहे. शेतकऱ्यांच्या या अपेक्षांकडे दुर्लक्ष करू नका. यावेळी मुश्रीफ यांनीही शेट्टी यांच्या या भाषणाची दखल घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घालून देण्याची ग्वाही यावेळी दिली.