जयसिंगपूर : राज्य साखर संघाने एफआरपीच्या कायद्याच्या सुनावणीत शेतकऱ्यांविरोधात हुजरेगिरी केल्याचा आरोप ‘स्वाभिमानी’चे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. या विषयात राज्याच्या महाभियोक्तांनी ज्ञान पाजळल्याची टीकाही त्यांनी केली.शेट्टी म्हणाले, राज्यातील उस उत्पादक शेतक-यांना एक रक्कमी ‘एफआरपी’ चा कायदा पुर्ववत व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवरील सुनावणी पुर्ण झाली असून लवकरच याबाबत उस उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळेल असा विश्वास वाटतो. राज्य सरकारचे महाभियोक्ता व राज्य साखर संघाचे वकील अंतरकर यांनी उच्च न्यायालयात शेतक-यांच्याविरोधात दोन आठवडे आपले उलटसुलट अज्ञान पाजळताना त्यांना जराही लाज वाटली नाही.केंद्राच्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नसताना एफआरपीच्या कायद्यात मोडतोड केली. एकीकडे शेतक-यांना १४ दिवसात एक रक्कमी ‘एफआरपी’ देणे बंधनकारक असताना राज्यात जवळपास तीन हजार पाचशे कोटी रूपयापेक्षा जास्त रक्कमेची ‘एफआरपी’ थकीत राहिली आहे.सरकारचा भत्ता व सोयीसुविधा घेणारे राज्याचे महाभियोक्ता बिरेंद्र सराफ व राज्य साखर संघाचे वकील अंतरकर यांनी केंद्र सरकारने केलेल्या कायद्याचा आदर करत राज्यातील लाखो उस उत्पादक शेतक-यांची बाजू मांडणे आवश्यक होते. मात्र दोघांनीही न्यायालयात साखर कारखानदारांची हुजरेगिरी केली. उस उत्पादकांची घरे जाळून साखर कारखानदारांना अभय देणा-या राज्य साखर संघाचे वकील अंतरकर यांनी तर राजू शेट्टी यांनी घातलेल्या उसाची सर्व बिले ‘एफआरपी’ प्रमाणे दिले असल्याचे न्यायालयास निदर्शनास आणून दिले. मात्र त्यांना चालू गळीत हंगामातील लाखो उस उत्पादकांचे थकीत हजारो कोटी रूपयाच्या रक्कमेबद्दल बोलावसे वाटले नाही, असे शेट्टी यांनी म्हटले आहे.
साखर संघाची शेतकऱ्यांविरोधात हुजरेगिरी, राजू शेट्टी यांचा आरोप
By राजाराम लोंढे | Updated: February 22, 2025 11:49 IST