कोल्हापूर : प्रारूप मतदार यादीतील घोळावरून रविवारी माजी पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रत्येक प्रभागातील यादीमध्ये चुका झाल्या असूून २०१५ च्या यादीच्या आधारे नवीन यादी करावी. हरकती देण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली. सकारात्मक उत्तर मिळाले नसल्यामुळे उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्यावर पदाधिकारी चांगलेच भडकले. आज, सोमवारी पुन्हा या संदर्भात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची ते भेट घेणार आहेत.
मतदार यादीतील घोळ सुधारण्यासाठी माजी महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे सभापती सचिन पाटील, गटनेते शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, राहुल चव्हाण, शिवानंद बनछोडे यांनी रविवारी महापालिका उपायुक्त रविकांत आडसूळ यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
स्थायी समितीचे माजी सभापती सचिन चव्हाण म्हणाले, प्रभाग क्रमांक ५७ नाथा गोळे आणि ४६ सिद्धाळा गार्डनच्या प्रारूप यादीत मोठी तफावत आहे. बीएलओ इच्छुकांच्या घरात जाऊन माहिती घेऊन यादी करीत आहे. आडनाव आणि घरक्रमांकानुसार यादी केली गेली नाही. वेळ घ्या, पण २०१५ च्या निवडणुकीतील यादीचा आधार घेऊन ‘घर ते घर’ जाऊन तपासणी करा. घर क्रमांकानुसार नवीन यादी करा. माजी उपमहापौर संजय मोहिते यांनी हरकतदाराला निर्णयाची माहिती अंतिम मतदार यादी करण्यापूर्वी दिली पाहिजे, असे सांगितले.
शारंगधर देशमुख यांनी यादीतील घोळ कसा दुरुस्त करणार आहे. प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे, अशी विचारणा केली. प्रभागात जादा नावे आलेली सांगू शकतो; पण प्रभागातील नावे दुसरीकडे गेल्याचे समजत नाही. प्रशासनाची चुकीमुळे घोळ झाला असून तज्ज्ञांकडून यादी करावी. हरकतीसाठी अवधी कमी असून मुदतवाढ द्या.
चौकट
राहुल चव्हाण भडकले
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणेच यादीचे काम सुरू आहे. दाखल होणाऱ्या हरकती तपासून कार्यवाही केली जाणार आहे. मुदतवाढ देण्याचा अधिकार महापालिकेला नाही. हरकतीवर उत्तर देणे क्रमप्राप्त नाही, असे उपायुक्त आडसुळे यांनी सांगितले. यावर गटनेते राहुल चव्हाण भडकले. ते म्हणाले, यादीत मोठा घोळ झाला असून जबाबदार प्रशासन आहे. किरकोळ नावे दुसरीकडे गेली असती तर ठीक होती. आपल्या प्रभागातून २५०० मते गायब झाली आहेत. यामध्ये दुरुस्ती झाली नाही तर न्यायालयात धाव घेऊ.