कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे माजी अध्यक्ष व यशस्वी नाट्यवितरक मनोहर कुईगडे (वय ८५) यांचे खरी कॉर्नर येथील घरी बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर बापट कॅम्प येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात ॲड. विश्वजित व ऋषिकेश ही दोन मुले व परिवार आहे. त्यांच्या पत्नी अरुंधती यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले.कुईगडे यांनी अतिशय कष्टात व संघर्षमय जीवन व्यतित केले. त्यांनी ह्यमहावितरणह्णमध्ये इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर म्हणून अनेक वर्षे सेवा बजावली. हे करतानाच त्यांनी नाट्य वितरणाचा व्यवसाय सुरू केला. त्या काळातील ते यशस्वी नाट्यवितरक होते. त्यांनी चंद्रलेखा, प्रसिद्ध बाबला ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांचे तसेच अनेक नाट्यप्रयोगांचे २५ वर्षांहून अधिक काळ यशस्वी आयोजन केले.
कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची स्थापना करण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. ते अनेक वर्षे परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष होते. तसेच त्यांनी वेगवेगळी पदेही भूषविली. गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स बँकेचेही ते काही काळ अध्यक्ष होते.
अभिनेता देव आनंद यांचे ते निस्सीम चाहते होते. त्यांनी अनेक वर्षे त्यांची तशीच जीवनशैली अंगिकारली होती. संगीत क्षेत्र हे त्यांचे जीव की प्राण. कल्याणजी आनंदजी हे त्यांचे आवडते संगीतकार होते.इच्छा अपूर्णकोल्हापूरमध्ये नाट्य परिषदेची स्थापना झाली त्याला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने यंदा कोल्हापुरात परिषदेचे शंभरावे नाट्यसंमेलनही होणार होते. मात्र कोरोनामुळे हे संमेलन रद्द करावे लागले. माझ्या हयातीत कोल्हापुरात एक तरी नाट्यसंमेलन व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र ती आता अधुरी राहिली.