कोल्हापुरात काँग्रेसला धक्का! माजी जि. प. अध्यक्ष, विद्यमान सदस्य उमेश आपटेंचा सदस्यपदाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 05:37 PM2023-01-18T17:37:25+5:302023-01-18T17:38:20+5:30
..त्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये यासाठीच राजीनामा दिला
सदाशिव मोरे
आजरा : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य उमेश आपटे यांनी आपल्या काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला. जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपुर्द केला. आपटे यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राजीनाम्यानंतर आमटे यांनी आपण समाजसेवा करणार पण राजकारणापासून अलिप्त राहणार असल्याची माहिती दिली.
काँग्रेस पक्षामध्ये वडील मुकुंदराव आपटे १९६५ पासून सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी उत्तूरचे सरपंचसह जि. प.मध्ये १४ वर्षे राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व केले. वडिलांच्या निधनानंतर गेली २७ वर्षे उमेश आपटे राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यरत आहेत. १० वर्षे पं.स. व १० वर्षे जि. प. सदस्य पदावर काम केले आहे. तर ५ वर्षे पं.स. उपसभापती म्हणूनही काम केले आहे. साखर कारखान्यामध्ये ती दोन वेळा संचालक झाले. मात्र दोन्हीही वेळा ते अपात्र ठरले आहेत. पत्नी वैशाली आपटे या ५ वर्षे उत्तूरच्या लोकनियुक्त सरपंच होत्या.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकही ग्रामपंचायत काँग्रेसची आली नाही. गेली ३० वर्षे पक्ष वाढविणे व कार्यकर्ते टिकवण्यासाठी प्रयत्न केले. मानसिक दृष्ट्या मी थकलो आहे. व पक्षासाठी काम करण्याची सध्या आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये यासाठीच आपण राजीनामा दिला आहे. जनतेची समाजसेवा करणार मात्र कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे उमेश आपटे यांनी स्पष्ट केले.