कराड: मजबूत सरकारसमोर सक्षम विरोधक असणे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. असे असले तर लोकशाही चांगल्या पद्धतीने टिकू शकते. राजकारणात विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी कार्यरत रहायला हवे, असे प्रतिपादन देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले आहे. कोल्हापूर दौऱ्याहून पुण्याला परतत असताना साताऱ्यात विश्रामगृहात त्या थांबल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. अदमापूरला जाऊन बाळूमामांचे दर्शन घेतले. त्यावेळी आदमापूर येथे असे सांगण्यात आले की, अमावस्येच्या दिवशी जवळपास एक लाख भाविक तेथे येतात. त्यांच्या पाण्याची सोय इथे होत नाही. तरी ती व्हावी, अशी मागणी तेथील लोकांनी आपल्याकडे केली. यावर तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आदमापूरात पाण्याची सोय करावी. पाण्याचे टँकर त्यादिवशी उपलब्ध करून देण्याबाबत सूचवले होते. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी होकार दिला, असे प्रतिभाताई पाटील यांनी सांगितले.
साताऱ्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात खूप बदल झालेत
राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्याांचा दौरा केला. महाराष्ट्राबद्दल नैसर्गिक ओढ असल्याने निवृत्तीनंतर दिल्लीला न राहता महाराष्ट्रातच स्थायिक झाले. महाराष्ट्र खूप गोड आहे. त्यामुळे त्याचे आपणास आकर्षण आहे. अलीकडच्या काळात साताऱ्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात खूप बदल झाले आहेत. औद्योगिक सुधारणा झाल्या आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचे युग आहे. सर्वत्र डिजिटलायझेशन झाले. ही चांगली गोष्ट आहे, असेही प्रतिभाताई पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, साताऱ्याला शिवाजी महाराजांचा वारसा लाभल्याने ऐतिहासिक महत्त्व आहेच. पण, स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असणारे मोठे स्वातंत्र्य सैनिकही येथे होऊन गेल्याने त्या दृष्टीनेही साताऱ्याला खूप महत्त्व आहे. नुकतेच छत्रपती उदयनराजे भोसले भेटून गेले. अतिशय आनंद वाटला. येथीलच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले, असे सांगत अनेक आठवणी प्रतिभाताई पाटील यांनी जागवल्या.