लोकमत न्यूज नेटवर्क
सेनापती कापशी : बाळेघोल (ता. कागल) येथील माजी सरपंच केरू आबा कांबळे (वय ९३) यांचे निधन झाले. १९५२ ते १९९७ या कालावधीत ग्रामपंचायत सदस्य व यातील पंचवीस वर्षे सरपंचपदी बिनविरोध राहण्याचा मान त्यांनी मिळविला होता. संपूर्ण गावात विजेचा प्रकाश मंजूर करीत असताना त्यांच्या स्वतःच्या कुडाच्या घरात मात्र अनेक वर्षे वीज नव्हती.
चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी बाळेघोल येथे सार्वजनिक पाणीपुरवठा योजना राबविली. बाळेघोल व हणबरवाडी येथील पाझर तलाव बांधकाम, तसेच कापशी - बाळेघोल रस्ता डांबरीकरण करण्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले होते. बाळेघोल गावच्या सर्वांगीण विकासात त्यांचे मोठे योगदान होते. सुरुवातीला कै. खासदार बाळासाहेब माने यांचे नेतृत्व मानून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारण करीत असताना त्यांना अनेक गटांकडून अनेक प्रलोभने आली; पण अखेरपर्यंत ते विक्रमसिंह घाटगे गटाशी एकनिष्ठ राहिले. गावच्या विकासासाठी घरातील भाकरी घेऊन स्वखर्चाने वेळ पडल्यास पायी प्रवास करणारे नि:स्वार्थी सरपंच म्हणून त्यांची कागल तालुक्यात ओळख होती. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे.