बेळगाव : खानापूर येथे २००६ मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांना १६ वर्षांनंतर याप्रकरणी जामीन मिळाला आहे. या गुन्ह्यात हजर राहण्यासाठी रामदास कदम काल, सोमवारी बेळगावला आले होते.
खानापूरमधील मेळाव्यात शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. कदम यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणाने खानापूर येथील समितीच्या मेळाव्यात साडेतीनशे जणांच्या जमावाने केलेला पोलिसांवर हल्ला, सरकारी गाड्यांची मोडतोड केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता त्यानुसार पोलिसांनी आयपीसी १५३ आणि १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याआधी ते कधीही तारखेला हजर झाले नव्हते. या केसमध्ये त्यांच्यावर कोर्टाने समन्स बजावले होते. वॉरंट काढले होते. अखेर खेड येथील त्यांच्या घरावर कोर्टाने मालमत्ता जप्तीचे नोटीस काढले होते. त्यानंतर त्यांच्या भावाने मुंबईत याची कल्पना त्यांना दिली. रामदास कदम सोमवारी ११ एप्रिल रोजी घटना झालेल्या तब्बल १६ वर्षानंतर त्या खानापूरमधील केसमध्ये कोर्टात हजर झाले आणि त्यांनी जामीन मिळविला.