सांगली : यंदाच्या एकरकमी ‘एफआरपी’सह टनास १७५ रुपये जास्त देण्याचा कोल्हापुरात झालेल्या बैठकीतील निर्णय सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी बुधवारी फेटाळला. हा निर्णय कोल्हापूरसाठी असून, बैठकीसाठी आम्हाला बोलावले नसल्याने हा निर्णय मान्य करायचा प्रश्नच येत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. प्रत्येक कारखाना ‘एफआरपी’ देईलच मात्र त्यापुढे किती द्यायचे, हे त्या-त्या कारखान्यांनी ठरवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत यंदाच्या एकरकमी ‘एफआरपी’सह टनास १७५ रुपये जास्त देण्याचा तोडगा काढण्यात आला. तो सर्वांना मान्य असल्याने तेथील गळीत हंगाम सुरळीत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, ऊसदराचा तोडगा काढण्यासाठी झालेल्या या बैठकीस सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना बोलावलेले नव्हते. त्यामुळे या कारखानदारांनी कोल्हापूरचा फॉर्म्युला मान्य नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कुंडलच्या क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड म्हणाले की, ज्या बैठकीस आम्हाला बोलावलेच नाही, त्या बैठकीतील निर्णय आमच्यावर कशासाठी लादता? आम्ही कायद्याने ‘एफआरपी’ची रक्कम शेतकऱ्यांना देणार आहोत. त्यापुढे किती रक्कम द्यायची, ते आम्ही पाहू. आम्ही शेतकऱ्यांची मुले असल्यामुळे शेतकऱ्यांचे सुख-दु:ख आम्हाला चांगलेच कळते. यामुळे ‘एफआरपी’वर किती रक्कम द्यायची, हे आम्हाला सरकारने सांगण्याची गरज नाही. हे सरकार कारखानदारांची आर्थिक कोंडी करून सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर ३८ ते ३९ रुपयांवर आहेत, मात्र सरकारने साखर निर्यात शुल्क वाढवले आहे. कोठा पद्धत सुरू केल्याने साखर वेळेत न विकल्यास गुन्हे दाखल होणार आहेत. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील म्हणाले की, तो निर्णय कोल्हापूर जिल्'ापुरता मर्यादित आहे. सांगलीसाठी तो लागू नाही. येथील शेतकऱ्यांना परवडेल एवढा आम्ही दर देणार आहोत. जिल्ह्यातील अन्य कारखानदारांनीही कोल्हापूर फॉर्म्युल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. या बैठकीस सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना न बोलावून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि साखर सहसंचालकांनी काय साध्य केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)
फॉर्म्युला सांगलीच्या कारखानदारांना अमान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2016 1:22 AM