कोल्हापूर : शहरातील रस्त्यांच्या कामाकरिता राज्य सरकारकडून पालकमंत्री सतेज पाटील यांनी मिळवून दिलेल्या २५ कोटींच्या तसेच दलित वस्ती सुधारणाअंतर्गत ११ कोटींच्या निधीतील रस्त्यांची बहुतांशी कामे पूर्णत्वाकडे जात असून, त्यामुळे रस्त्यांचे चित्र आता बदलत आहे. सगळे रस्ते पेव्हर पद्धतीने केले जात आहेत.
गेल्या अनेक वर्षांत प्रथमच राज्य सरकार, जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. राज्यात आलेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे महापालिकेला झुकते माप मिळाले. पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी रस्त्यांच्या कामाकरिता २५ कोटी तसेच दलित वस्ती सुधारणाकरिता ११ कोटींचा निधी दिला. त्याशिवाय जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून जवळपास तीन कोटींचा निधी मिळवून दिला. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांचे भाग्य उजाळले.
कोणत्याही परिस्थितीत मार्चपूर्वी ही कामे करायची असल्याने त्याची निविदाप्रक्रिया तातडीने राबवून कामांना सुरुवात केली. वाहतुकीला अडथळा होऊ नये तसेच जलदगतीने कामे व्हावीत म्हणून रात्रीच्या वेळी सुद्धा रस्त्यांची कामे केली जात आहेत. शहरातील सहा मीटर रुंदीच्या वरील सर्वच प्रमुख रस्ते तसेच गल्लीबोळातील रस्ते या निधीतून करण्यात येत आहेत.
सन २०१९ मधील महापूर, तर २०२० मधील कोरोना साथ यामुळे रस्त्यांच्या कामांना निधी मिळाला नाही. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती. महापालिकेची आर्थिक परिस्थितीही कोरोनामुळे खालविल्यामुळे कामांसाठी फारसा निधी मिळाला नाही. परंतु कोरोना संपत येताच डिसेंबरपासून पालकमंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ यांनी निधी आणण्याचे प्रयत्न सुरू केले.
आता ३९ कोटींची विकासकामे पूर्णत्वाकडे जात असून, आता नव्याने दलित वस्तीअंतर्गत ११ प्रभागांना प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे ११ कोटी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या २५ कोटींच्या निधीतून काही कामे हाती घेतली जाणार आहेत. ही कामे निविदाप्रक्रियेत आहेत.
( फोटो देत आहे)