कोल्हापूर : काळ हाच बदलाचा साक्षीसार असतो असे म्हणतात ते खरंच आहे. एकेकाळी नदी, तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन करू नका, असे सांगून घसा कोरडा करूनही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या विनंतीकडे ढुंकुनही न पाहणाऱ्या कोल्हापूरकरांनी मंगळवारी शहरातील सर्वच गणेश मूर्तींचे इराणी खणीत विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची पायाभरणी अधिक मजबूत केली. इराणी खणीत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील ५२ हजार ५४५ घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन झाले, तर त्याचवेळी १५० टन निर्माल्य गोळा झाले.
पंधरा-वीस वर्षापूर्वी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे तसेच पर्यावरणवादी कार्यकर्ते घरगुती गणेश विसर्जनाच्या दिवशी पंचगंगा नदी घाट, रंकाळा, कळंबा, राजाराम, कोटीतीर्थ अशा विविध तलावावर थांबून नदीत तसेच तलावात गणेश विसर्जन न करता विसर्जित मूर्ती दान करा, असे आवाहन करत होते. परंतु त्यांच्या या आवाहनास अजिबात प्रतिसाद मिळत नव्हता. उलट या कार्यकर्त्यांच्या समोरच गणेश मूर्ती नदीत, तलावात विसर्जित करत होते. प्रसंगी वादाच्या घटनाही घडत होत्या.
परंतु काळ बदलला तसा शहरवासीयांचा दृष्टिकोन सुध्दा बदलला. जरी कोरोना संसर्गाचे कारण असले तरी अलीकडील पंधरा वर्षात यंदा झालेले परिवर्तन नक्कीच पर्यावरण जपणारे ठरले. काळ हाच बदलांचा साक्षीदार असतो याचे प्रत्यंतर मंगळवारी शहरात पहायला मिळाले. महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केलेल्या आवाहनानुसार यंदा सलग दुसऱ्या वर्षी गणेश मूर्ती ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम कुंडातून करण्यात आले. यंदा तर शंभर टक्के प्रतिसाद लाभला. शहरवासीयांनी निर्माल्यसुध्दा पाण्यात न टाकता ते महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपुर्द केले.
महानगरपालिकेने मूर्ती विसर्जनाची केलेली नीटनेटक्या तसेच उत्तम व्यवस्थेमुळे विसर्जनावेळी होणारी गर्दी विखुरली गेली. विसर्जन प्रक्रिया सुलभ तसेच झटपट झाली. त्याच बरोबर मूर्तींचे इराणी खणीत पुनर्विसर्जन करणे सोयीचे झाले. गोळा झालेले निर्माल्य खत निर्मितीकरिता देणे शक्य झाले. एकंदरीत यंदाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा पाया अधिक मजबूत झाला.
- शहरातील विसर्जन मूर्ती संख्या -
- गांधी मैदान विभागीय कार्यालय - ११ हजार ०९९
- शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय - १० हजार २१९
- राजारापुरी विभागीय कार्यालय - ८५९४
- ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय - ७०४१
- परस्पर इराणी खणीत झालेले विसर्जन - १५ हजार ६८२
- एकूण मूर्ती विसर्जन संख्या - ५२ हजार ५४५
- निर्माल्या दान - १५० टन
आष्ट्याहून दोन ट्रक मूर्ती विसर्जनासाठी कोल्हापुरात-
कोल्हापूर शहराला लागून असलेल्या पाचगांव, कळंबा गावातील गणेा मूर्ती इराणी खणीवर आणण्यात आल्या होत्या. तसेच सांगली जिल्ह्यातील आष्टा येथूनही दोन ट्रक भरून मूर्ती विसर्जनासाठी इराणी खणीवर आणण्यात आल्या होत्या. इराणी खणीवरील विसर्जन रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होते.