प्रकाश पाटीलकोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा येथील ब्रिटिशकालीन पुलाला समांतर पुलाचे काम सुरू आहे. हे काम संथ गतीने सुरू असल्याबद्दल ‘लोकमत’मधून आवाज उठवला याची दखल घेऊन कामाला गती देण्यासाठी आज गुरुवारी ठेकेदाराने आधुनिक मॅट मशीनद्वारे पाया खोदण्यास सुरुवात केली आहे.कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचे रुंदीकरण सुरू असून बालिंगा येथील ब्रिटिश कालीन पुलाला १४० वर्षे पूर्ण झाल्याने या पुलाची आयुमर्यादा संपली आहे. याच ठिकाणी उत्तरेला पर्यायी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. गेली वर्षभर पुलाच्या दक्षिणेकडे उभा करण्यात येणाऱ्या पिलरच्या पायल टाकण्याचे काम संथ गतीने सुरू होते. पावसाळ्यापूर्वी पूल पूर्ण होणार नाही. पावसाळ्यात पूर आल्यास जुना पूल रहदारीस बंद करावा लागणार आहे. गतवर्षी मच्छिंद्री झाल्यानंतर पंधरा दिवस पूल वाहतूक बंद करण्यात आला होता. याचा चार तालुक्यांतील जनतेला नाहक त्रास झाला होता.
यावेळी नागरिकांनी आंदोलन करून पुलावरून वाहतूक सुरू केली होती. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी नवीन पुलाचे काम पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, गेली वर्षभर पायल टाकण्याचे कामसुद्धा पूर्ण झालेले नाही. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवला होता. संबंधित ठेकेदाराला राष्ट्रीय महामार्ग विभागाने नोटीस बजावली. गुरुवारी अत्याधुनिक मॅट मशीनद्वारे पाया खोदण्यास सुरुवात केली आहे. या मशीनच्या साह्याने पाया खोदण्याचे काम होईल. मात्र, पावसाळा तोंडावर आला असून पुलाचे काम थांबणार आहे.
आधुनिक मॅट मशीनद्वारे पाया खोदण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील मुरूम काढला जाणार आहे. यामुळे कामाला गती मिळणार आहे. - शुभम पाटील (कनिष्ठ अभियंता राष्ट्रीय महामार्ग)