कोल्हापूर : कोविड लसीकरणानंतर लगेच रक्तदान करता येत नसल्याने रक्तदानासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने सध्या रक्तपिशव्या शिल्लक आहेत. सुमारे ४५०० रक्त पिशव्या रक्तपेढ्यांमध्ये पडून आहेत. कोविडची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर पुन्हा रक्ताची गरज भासली तर उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.
कोविड लसीकरणानंतर साधारणत: दोन महिने रक्तदान करता येत नव्हते. मात्र, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने नुकतेच नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार पहिला किंवा दुसऱ्या डोस घेतल्यानंतर चौदा दिवसांनी रक्तदान करता येते. मध्यंतरी लसीकरणामुळे रक्तटंचाई भासल्यानंतर सामाजिक संस्थांना आवाहन केले होते, त्याला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, तोपर्यंत काेविडचे रुग्ण वाढू लागल्याने रुग्णालयात उपचारासाठी इतर रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे रक्त व रक्तघटकांची मागणी कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील रक्तपेढीत ४५०० हून अधिक रक्तसाठा उपलब्ध आहे. मात्र, मागणी निम्म्याहून कमी असल्याने रक्त व रक्तघटकाचा उठाव होत नाही. रक्ताचा मुदतीत वापर झाला नाही तर ते नष्ट करावे लागणार आहे.
कोविडचे रुग्ण कमी झाल्यानंतर पुन्हा रक्ताची मागणी वाढेल आणि रक्तदात्यांची संख्या कमी होईल. ऐन गरजेवेळी रक्ताची टंचाई भासू लागेल, यासाठी गरज पाहूनच रक्तदान शिबिरांचे नियोजन करण्याची गरज आहे.
कोट -
राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेच्या नवीन नियमावलीनुसार लसीकरणानंतर चौदा दिवसांनी रक्तदान करता येत असल्याने गरजेनुसारच रक्तदान करावे. रक्तदानाऐवजी कोविड रुग्णांसाठी प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यावे.
-प्रकाश घुंगूरकर (अध्यक्ष, कोल्हापूर रक्तपेढी असोसिएशन)