कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह शौमिका महाडिक व शशिकांत खोत यांचे अर्ज वैध ठरले. नगरसेवकांनी बोगस सह्यांची तक्रार केलेले उमेदवार संजय भिकाजी मागाडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहूल रेखावार यांनी दिली.जिल्ह्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी ५ उमेदवारांनी सात अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी आज, बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाली. ही प्रक्रिया सव्वा बारा वाजता संपली. यावेळी महाविकास आघाडी, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मंत्री सतेज पाटील, भाजपचे अधिकृत उमेदवार माजी आमदार अमल महाडिक, भाजप महिला जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक (अपक्ष) व शशिकांत खोत (अपक्ष) यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले.
उमेदवार संजय भिकाजी मागाडे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरील सुचक म्हणून नावे असलेल्या नगरसेवकांनी अर्जावर आमच्या बोगस सह्या करण्यात आल्याची तक्रार मंगळवारी केली होती. छाननी दरम्यान या सह्या बोगस असल्याचे स्पष्ट झाल्याने मागाडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.उर्वरीत चारही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून ही यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.आज सकाळच्या सुमारास अर्ज छाननी दरम्यान पाटील-महाडिक सर्मथक मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जमा झाले होते. यामुळे परिसरातील वातावरण तणावपुर्ण बनले होते. तर, भाजपचे नेते, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेत सतेज पाटील यांनी अर्जात खोटी माहिती दिली असल्याचा गंभीर आरोप केला. इतकेच नाही तर, याबाबत उद्या, गुरुवारी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जरी ते निवडून आले तरी त्यांना तीन महिन्यात अपात्र ठरवणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.