कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पुण्याच्या प्रवाशास लुटल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी चौघा संशयित युवकांना रविवारी रात्री अटक केली. संकेत जाधव, अभिषेक विभूते, महेब्बुब खलीफा, ओंकार पाटील (सर्व, रा. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुण्यातील केदार रवींद्र घोडके (वय ३१, रा. सनशाईन हिल व्हूज सोसायटी, कात्रज, पुणे) हे कंपनीच्या कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. पुण्याला जाताना शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात त्यांना रिक्षाचालकांसह चौघांनी लुटले होते. त्यांच्याकडील लॅपटॉपची बॅग, तसेच चांदीचे कडे, सोन्याची अंगठी, मोबाईल व दोन हजारांची रोकड असा सुमारे ३८ हजारांचा मुद्देमाल हिसकावून रिक्षातून पलायन केले.
घोडके यांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी शोधकार्य राबविले. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वाईल्डर मेमोरियल चर्चच्या पाठीमागील बाजूस कनाननगरकडे जाणाऱ्या रोडवर पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी संकेत जाधव, अभिषेक विभूूते, महेब्बुब खलीफा, ओंकार पाटील यांना अटक केली.दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्रीच मध्यवर्ती बसस्थानकावर चाकूचा धाक दाखवून आणखी एका दोघा प्रवाशांना लुटण्याचा प्रकार घडला होता, त्यातील संशयितांचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.