कोरोचीतील चव्हाण टेकडीवर झालेल्या शुभम कमलाकर खूनप्रकरणी अनिल पांडव, सुनील पांडव, स्वप्नील कोळी, विरेश हिरेमठ (सर्व रा. हातकणंगले ) या चौघा संशयितांना मंगळवारी रात्री १ वाजता शिवाजीनगर (इचलकरंजी) च्या पोलीस पथकाने सापळा रचून पट्टणकोडोली येथून ताब्यात घेतले. गुरुवारी त्यांना हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चारही संशयितांना गुरुवारी इचलकरंजी येथील न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या खुनातील दोघे संशयित अद्याप फरारी आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत या खुनाचा छडा लावला असताना, हातकणंगले पोलीस मात्र हातावर हात ठेवून गप्प आहेत.
मंगळवारी रात्री नऊच्यासुमारास कोरोचीतील चव्हाण टेकडीवर हातकणंगलेतील शुभम कमलाकर याचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. शुभमच्या खुनामागे प्रेमाचा त्रिकोण, पूर्ववैमनस्य आणि पोलिसाच्या खबऱ्यांचा कायमचा काटा काढण्याचे अँगल समोर येत आहेत. याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. संशयित चौघांशिवाय अजून दोघे या खून प्रकरणामध्ये सहभागी असल्याचे पुढे आले आहे.
शुभम कमलाकरच्या खुन्यांना शोधण्यासाठी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास यंत्रणा अधिक गतिमान करून पट्टणकोडोली येथून अनिल पांडव, सुनील पांडव, स्वप्नील कोळी, विरेश हिरेमठ यांना ताब्यात घेतले होते. या संशयितांना हातकणंगले पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली आहे. या कारवाईमध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मगर, रफिक पाथरवट, उदय पाटील, प्रशांत ओतारी, प्रकाश कांबळे, महेश पाटील, अविनाश भोसले, विजय माळवदे आदींचा समावेश होता.
फोटो = चार संशयितांचे फोटो पाठवले आहेत.