कोल्हापूर : संभाजीनगरातील गजानन महाराज नगर परिसरात मंगळवारी मध्यरात्रीत चार ठिकाणी घरफोड्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी बंद बंगल्यांना लक्ष्य केल्याचे दिसून आले.
गजानन महाराज नगर परिसरातील ओम गणेश कॉलनीत नवनीत आनंदराव काशिद याचा दुमजली बंगला असून रात्री तळमजल्यात कुलूप लावून झोपण्यासाठी पहिल्या मजल्यावर गेले. रात्री सव्वातीन वाजता ते झोपले. बुधवारी सकाळी खाली आल्यानंतर दरवाजाचे कुलूप तोडून, कडी-कोयंडा उचकटून चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्याने लोखंडी कपाट फोडून आतील सोन्याची चेन, १ तोळ्याचे दोन वळे, लहान मुलांच्या १४ अंगठ्या, चांदीचे निरंजन, पितळी समई व पाच हजारांची रोकड असा मुद्देमाल चोरुन नेला. याच कॉलनीतील उमेश खटावकर यांच्या बंद घराचा कडीकोयंडा चोरट्यांनी तोडला, पण घर रिकामे असल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. चोरट्यांनी गजानन महाराज नगरात मोर्चा वळवला. मुलींच्या वसतिगृहामागे स्वाती रेसिडेन्सीमधील सचिन सुभाष नरुले यांच्या बंद बंगल्याची लॅच तोडून आतील एलसीडी टीव्ही, चांदीचा करंडा आदी साहित्यांची चोरी केली. नरुले हे सहकुटुंब पुण्याला मुलाकडे गेले आहेत.
याशिवाय शिवराई कॉलनीतील रावसाहेब आण्णासाहेब पाटील हेही पुण्यात मुलांकडे असतात. चोरट्याने त्यांच्याही बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरातील कपाट फोडले. साहित्य घरभर विस्कटले. शेजारील मुलीला दरवाजाबाहेर कुलूप पडल्याचे दिसल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. दोन्ही घरमालक पुण्याहून आल्यानंतरच किती मुद्देमाल चोरीला गेला हे स्पष्ट होईल. घरफोड्यांची जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
तीन चोरटे सीसी कॅमेऱ्यात कैद
गजानन महाराज नगरात तिघे चोरटे चोरी करत असल्याचे परिसरात बंगल्यातील एका सीसी कॅमेरा टीव्ही फुटेजमध्ये कैद दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांचे श्वानपथकही परिसरातच घुटमळले. ठसे तज्ज्ञांना काही ठिकाणी चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळाले आहेत.
(फोटो फाईल स्वर्तत्र पाठवत आहे)