कोल्हापूर : जमीन खरेदीसाठी दिलेल्या पैशांचे व्याज व मुद्दल मागणीवरून ताराबाई पार्कमधील दाम्पत्याच्या घरात घुसून त्यांना धक्काबुक्की करीत ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार बुधवारी (दि. ३१) दुपारी घडला. याबाबत वडणगे येथील खासगी सावकारांसह एकूण चौघांवर सावकारकी प्रतिबंधात्मक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दीपक रामचंद्र कचरे (वय ३६), पांडुरंग सुभाष पाटील (४०, दोघेही रा. वडणगे, ता. करवीर) व अनोळखी दोघेजण अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. पूजा रंगराव खोंद्रे (रा. करण हाईट्स, फ्लॅट नं. ३, दुसरा मजला, सरदार कॉलनी, पितळी गणपती मंदिरासमोर, ताराबाई पार्क) यांनी ही फिर्याद दिली असून त्यांनी, कचरे यांनी घरातील एक लाख रुपये चोरून नेल्याची तक्रार दिली आहे.याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी पूजा खोंद्रे यांचे पती रंगराव खोंद्रे यांनी दीपक कचरे याच्याकडून जमीन खरेदीसाठी पाच टक्के व्याजाने पाच लाख रुपये घेतले होते. त्यांपैकी त्यांनी वेळोवेळी मुद्दल व व्याजासहीत तीन लाख रुपये परत दिले आहेत; पण कचरे हे रंगराव खोंद्रे यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करीत होते.
मंगळवारी (दि. ३० जुलै) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दीपक कचरे, पांडुरंग पाटील तसेच अनोळखी दोघेजण त्यांच्या घरात घुसले. त्यांनी रंगराव खोंद्रे यांच्याकडे व्याजाने दिलेल्या पैशांची मागणी करीत त्यांना धक्काबुक्की केली. त्यावेळी पाटील याने खोंद्रे यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्याच वेळी सावकार दीपक कचरे यांनी जबरदस्तीने पूजा खोंद्रे यांच्या बेडरूममध्ये प्रवेश करून त्यांच्या कपाटातील सुमारे एक लाख रुपये चोरून नेले. याबाबत पूजा खोंद्रे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.