कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबरच्या पहिल्या वीस दिवसांत चारवेळा ढगफुटी झाली. करवीर तालुक्यात सर्वाधिक २४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसापेक्षा हा अधिक असून त्यामुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे.यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच मान्सून सक्रिय झाला. त्यामुळे खरिपाची उगवण जोमात झाली, त्यानंतर टप्प्या-टप्प्याने खरिपाला पोषक असाच पाऊस राहिला. सप्टेंबरनंतर पाऊस काहीशी विश्रांती घेईल, असा अंदाज होता. मात्र, ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. त्याला चक्रीवादळाची जोड मिळाल्याने पाऊस अद्याप थांबण्याचे नावच घेत नाही.
गेल्या वीस दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी १५९.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस करवीर तालुक्यात २४० मिलीमीटर तर सर्वांत कमी ९१ मिलीमीटर भुदरगड तालुक्यात झाला आहे. या वीस दिवसांत चारवेळा ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे.
गतवर्षी १ ते २० ऑक्टोबरपर्यंत सरासरी १२६ मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्यावर्षी जुलै, ऑगस्टमध्ये धुवांधार पाऊस झाला होता. त्यामुळे वार्षिक सरासरीत जादा पाऊस झाला होता. मात्र, यंदा ऑक्टोबरमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या वीस दिवसांत राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा, करवीर तालुक्यात चारवेळा ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे.धरणक्षेत्रातही जोरदार पाऊसगेल्या वीस दिवसांत धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत आहे. शाहूवाडी तालुक्यातील कासारी धरण क्षेत्रात ३७७ मिलीमीटर पाऊस झाला तर राधानगरीत १४२, वारणा ८९ तर दूधगंगा धरण क्षेत्रात ८८ मिलीमीटर पाऊस झाला.चंदगड, राधानगरी सरासरी मागेचऑक्टोबरमध्ये एवढा पाऊस होऊनही चंदगड व राधानगरी तालुक्याने अद्याप सरासरी ओलांडलेली नाही. चंदगडमध्ये सरासरीच्या ९२ टक्के तर राधानगरीच्या ६३ टक्के पाऊस झाला आहे.१ ते २० ऑक्टोबर या कालावधीत तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा-तालुका पाऊस
- हातकणंगले १६१
- शिरोळ १८८
- पन्हाळा २४७
- शाहूवाडी १४०
- राधानगरी ८२
- गगनबावडा २०१
- करवीर २४०
- कागल १४५
- गडहिंग्लज २०४
- भुदरगड ९१
- आजरा ११५
- चंदगड ९९