गारगोटी-गेले दोन दिवस तालुक्यात संततधार जोरदार पावसामुळे वेदगंगा नदीला पूर आला असून गारगोटी, म्हसवे,वाघापूर, निळपण हे चार बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.पाटगाव धरण क्षेत्रासह तालुक्यात अतिवृष्टी होत असल्याने वेदगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे .नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा नायब तहसीलदार संदीप भूतल यांनी दिला आहे .गेल्या चोवीस तासात २०७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तर एक जून पासून आजपर्यंत ९३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.पाटगाव येथील विद्युत प्रकल्पाच्या वीजनिर्मितीसाठी २२५ क्यूसेक्स ने विसर्ग सुरू आहे.सतत पडणाऱ्या पावसामुळे भात पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे .अचानक पाण्याचा जोर वाढल्याने शेतात पाण्याची पातळी वाढून शेतीच्या बांधाचे नुकसान होत आहे.सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.पाटगाव मध्यम प्रकल्प माहिती
- पाणी पातळी -६१८.६८ मीटर
- एकूण पाणीसाठा-४७.३४ द.ल.घ.मी (१६७१.८१ द.ल.घ.फू.)
- टक्केवारी - ४४.९८%