एकनाथ पाटील
कोल्हापूर : परिसर नक्षलवादी, कमालीची बेकारी, आई-वडीलांवर आपला बोझ नको, काम करुन पोट भरायचे असा मनाशी निश्चिय करीत त्या विचाराने गडचिरोलीतून घराबाहेर पडला. नोकरीच्या शोधात भरकटलेल्या या मुली महाराष्ट्र एकस्प्रेस रेल्वेने थेट कोल्हापुरात आल्या. मराठी नीट बोलता येत नाही, कोणाची ओळख नाही, की परिसर अनोळखी. चार दिवस उपाशीपोटी त्यांचा मुक्काम रेल्वे स्टेशनवरील फुटपाथवर होता. या मुली शाहुपूरी पोलीसांच्या नजरेला पडल्या अन त्यांची कहाणी ऐकून सगळेच गहिवरले. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी त्यांना जेवण देवून गडचिरोली पोलीसांशी संपर्क साधून आई-वडीलांच्या ताब्यात सुखरुप दिले.
निकिता शिवराज पदा (वय १८), नम्रता जयराम पदा (१७, दोघी रा. माळंदा, धानोरा, गडचिरोली), रागिनी सगरुजी गावडे (१८, रा. चवेला ता. धानोरा, गडचिरोली) अशी त्यांची नावे आहेत. मुलींना सुखरुप पालकांच्या ताब्यात दिलेबद्दल शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोरे, कॉन्स्टेबल राम तळपे, सविता पाटील, ज्योती कांबळे यांचे कौतुक होत आहे.
कोल्हापूर रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या चार दिवसापासून तीन मुली संशयितरित्या फिरत आहेत अशी माहिती शाहुपूरी पोलीसांना मिळाली. १३ जुलैला त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता धानोरा-गडचिरोली येथून नोकरीच्या शोधात भरकटल्या आणि महाराष्ट्र एक्स्प्रेसने कोल्हापुरात आल्याचे समजले. त्या तिघीही आदिवासी जंगल भागातल्या आहेत. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. नोकरी करुन पोट भरायचे असा मनाशी विचार करुन त्या घरातून बाहेर पडल्या. महाराष्ट्र एक्स्प्रेसने त्या थेट कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर आल्या. परिसर नवखा, कोणाशी ओळख नाही, जवळ पैसे नाहीत, मराठी निट बोलता येत नाही अशा परिस्थितीत त्या भेदरुन गेल्या. गेली चार दिवस त्या उपाशी होत्या. तिघींनाही अशक्यतपणा आला होता.
सैरभैर झालेल्या अवस्थेत त्या रेल्वे स्टेशन परिसरात फिरत होत्या. रात्रीचा मुक्काम येथील फुटपाथवर करीत होत्या. रात्रगस्त घालत असताना शाहुपूरी पोलीसांना या मुली दिसल्या. त्यांना पोलीस ठाण्यात आनले. विश्वासात घेत विचारपूस केल्यानंतर खरा प्रकार पुढे आला. उपाशी असल्याने त्यांना जेवण दिले. सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन कसबा बावडा येथील तेजस्विनी महिला सुधारगृहात ठेवले. निरीक्षक मोरे यांनी गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून माहिती दिली.
मुलींच्या आई-वडीलांना घेवून तेथील पोलीस कोल्हापुरात आले. बेपत्ता झालेल्या मुली सुखरुप डोळ्यासमोर पाहून आई-वडीलांनी अश्रू ढाळले. त्यांनी व गडचिरोली पोलीसांनी शाहुपूरी पोलीसांचे कौतुक केले.