राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असल्याने आजूबाजूच्या वीस पंचवीस खेड्यातील नागरिकांचा या ना त्या कारणाने वावर असतो. लॉकडाऊनच्या काळातही सकाळी सात ते अकरा या वेळेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ प्रमुख बाजारपेठेसह अन्य ठिकाणी दिसत आहे.
दरम्यान, कसबा तारळे आजअखेर कोरोना बाधित रुग्णांची संख्या दहावर गेली असून, परिसरातील चार गावांत सहा रुग्णांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना संसर्ग रुग्णांची दिवसेंदिवस होणारी वाढ प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखी बनली आहे.
या पार्श्वभूमीवर मंडल अधिकारी शिवाजीराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत चार दिवसांसाठी कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, मेडिकल, दूध संकलन फक्त सुरू राहणार असून, अन्य सर्वच व्यवहार बंद राहणार आहेत. संचारबंदी असल्याने कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या असून, विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व कोविड टेस्ट यांसारखी कारवाई करण्यात येणार आहे.