भिलवडी : अंकलखोप (ता. पलूस) येथील झालेल्या पत्नी व मुलाच्या खून प्रकरणातील आरोपी शंकर दिनकर पाटील (वय ४५) यास पलूस येथील न्यायालयाने आज चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शंकर पाटील याने अंकलखोप येथील नागठाणे फाट्याजवळ असणाऱ्या राहत्या घरामध्ये दारूच्या नशेमध्ये पत्नी व मुलाचा खून केला होता. त्याने पत्नी शैला शंकर पाटील (४०) हिच्या गळ्यावर धारदार कोयत्याने वार केला होता, तर मुलाला काठोकाठ पाणी भरलेल्या विहिरीमध्ये फेकून बुडवून मारले होते. तो नेहमी दारूच्या नशेमध्ये घरामध्ये पत्नीशी वारंवार वाद घालून भांडत असे. त्याची आई व नऊ वर्षाची मुलगी भिलवडी येथील नातेवाईकाकडे गेली असल्याने त्यांचा जीव वाचला असल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर आरोपी शंकर पाटील याने सायंकाळी भिलवडी पोलीस ठाण्यात हजर राहून आपण गुन्हा केल्याची कबुली दिली होती. रात्री उशिरा त्याची पत्नी व मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोपीस शंकर पाटील यांचे घरातून भिलवडी पोलिसांनी खुनामध्ये वापरण्यात आलेला कोयता ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी आज पलूस येथील फौजदारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास ३ नोव्हेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नव्यानेच सुरू झालेल्या भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र कोठडीची सोय नसल्याने आरोपीची रवानगी पलूस ठाण्यामधील कोठडीत करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड करीत आहेत. (वार्ताहर)
संशयिताला चार दिवस कोठडी
By admin | Published: October 31, 2014 11:48 PM