कोल्हापूर : म्युकरमायकोसिस या बुरशी संसर्गामुळे जिल्ह्यातील चौघा रुग्णांचा मृत्यू झाला असून अजून तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकीकडे कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत असताना, आता या नव्या आजारामुळे रुग्ण मृत्यू पावू लागल्याने चिंता वाढली आहे.
कोरोनावरील उपचारादरम्यान रुग्णाच्या श्वासनलिकेत बुरशी संसर्ग होतो. त्याला ‘म्युकरमायकोसिस’ म्हणतात. या उपचारादरम्यान रुग्णांना जे स्टेरॉईड दिले जातात, त्यामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होते आणि हा बुरशीचा संसर्ग वाढत जातो. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना याचा अधिक धोका असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात असे सात रुग्ण आढळले असून यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एका सुसज्ज विश्वस्त रुग्णालयामध्ये हे चौघेजण उपचार घेत होते. या नव्या आजाराची दखल घेत याच्या बाधितांचाही अहवाल मागविण्यास आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. तिघे कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील खासगी, शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्यावर सर्वसाधारण वाॅर्डमध्येच उपचार सुरू आहेत. म्युकरमायकोसिसच्या लक्षणांची खात्री करण्याचे कामही आरोग्य विभागाकडून सुरू असून या नव्या आजारामुळेही आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.