कोल्हापूर : पंजाब राज्यात गोळीबार करून कार्यालयावर दरोडा टाकून कोटींची रोकड लुटून राष्ट्रीय महामार्गावरून काेल्हापूर मार्गे गोव्याकडे पलायन करणाऱ्या हरयाणातील खतरनाक दरोडेखोरांच्या टोळीतील चौघांना ममेवाडी फाटा (ता. आजरा) येथे कोल्हापूरपोलिसांनी अत्यंत धाडसाने पकडले. दरोडेखोरांकडे प्राणघातक हत्यारे असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी नाकाबंदी करत त्यांच्या मुसक्या आवळल्या.
अभय प्रदीप सिंग (वय २०, रा. बांध, ता. इत्राना, जि. पानिपत), आर्य नरेश जगलान (२०, रा. इवान, हरयाणा), महिपाल बलजित झगलान (३९, रा. इथाना, पानिपत), सनी कृष्णा झगलान (३९, रा. इथाना, हरयाणा) अशी अटक केलेल्या चौघा दरोडेखोरांची नावे आहेत.
पंजाब राज्यातील एसएस नगर जिल्ह्यात डेराबसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकावर गोळीबार करून भूखंड खरेदी-विक्री व्यवसायाच्या कार्यालयावर दरोडा टाकून कोटींची रक्कम लुटून चार दरोडेखोर मोटारीतून गोव्याकडे निघाले. ते पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूर, कोगनोळी, आजरा मार्गे पलायन करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाचे पो. नि. संजय गोर्ले यांना पुढील सूचना दिल्या. गोर्ले यांनी कागल पोलिसांना कोगनोळी टोलनाका येथे नाकाबंदीच्या सूचना दिल्या. तत्पूर्वी मोटार कोगनोळी टोल नाका ओलांडून निपाणीच्या दिशेने गेली.
पो. नि. गोर्ले यांनी आजरा पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि. सुनील हारुगडे यांना पुढील सूचना दिल्या. हारुगडे यांनी पाच पोलिसांच्या मदतीने ममेवाडी फाटा येथे नाकाबंदी केली. संबंधित वर्णनाची मोटार येताना दिसताच पोलिसांनी अडवून त्यातील चौघा दरोडेखोरांना पकडले.
पाठोपाठ ‘एलसीबी’चे सहा. पो. नि. किरण भोसले पथकाने पोहोचून दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्यांना कोल्हापुरात आणून पुढील कारवाईसाठी पंजाब येथून आलेले डेराबसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कमल शेखो यांच्या ताब्यात दिले.
आजरा पोलिसांचे विनाशस्त्र धाडस
दरोडेखोरांकडे प्राणघातक हत्यारे असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सावधगिरी बाळगावी, अशा सूचना ‘एलसीबी’ने दिल्या. वेळेअभावी आजरा पोलिसांना संरक्षणासाठी शस्त्र घेण्याची संधीच मिळाली नाही. तरीही त्यांनी धाडसाने सापळा रचून या खतरनाक दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.
धाडसी पथकाला दहा हजाराचे बक्षीस
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीस पथकाला दहा हजाराचे बक्षीस जाहीर करून कौतुक केले. ‘एलसीबी’चे पो. नि. संजय गोर्ले यांच्या सूचनेनुसार आजरा पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि, सुनील हारुगडे व पथकातील सहा. फौजदार बिराप्पा कोचरगी, पोलीस राजेश आंबुलकर, निरंजन जाधव, अमोल पाटील यांनी अत्यंत धाडसाने ही कारवाई केली.