प्रदीप शिंदे -- कोल्हापूर सरकारने वीज वाचविण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. या अंतर्गत ३०० रुपयांचा एलईडी बल्ब फक्त १०० रुपयांत नागरिकांना देण्याची योजना केंद्र सरकारने आणल्याने कोल्हापूर जिल्ह्यात अवघ्या महिन्याभरात चार लाख २१ हजार, तर सांगली जिल्ह्यात दोन लाख सहा हजार एलईडी बल्बची विक्री झाली. दोन्ही मिळून सहा लाख २७ हजार एलईडी बल्बची विक्री झाली आहे. एलईडी बल्बमुळे विजेची बचत होते. ते पर्यावरणपूरक असतात; मात्र त्यांचे दर जास्त असल्याने नागरिक त्यांच्याकडे पाठ फिरवीत होते. मात्र, विजेची बचत आणि ग्राहकांच्या विजेचे बिल कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि महावितरणतर्फे पर्यावरणपूरक एलईडी बल्बची विक्री राज्यात सर्वत्र करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही या एलईडी बल्बची विक्री करण्यात येत आहे. जिल्ह्यात एका महिन्यात चार लाख २१ हजार, तर सांगली जिल्ह्यात दोन लाख सहा हजार एलईडी बल्बची खरेदी ग्राहकांनी केली आहे. १०० रुपये भरून बल्ब खरेदी करण्यापेक्षा मासिक दहा रुपये हप्त्यावर बल्ब घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सुमारे २६ हजारहून अधिक ग्राहकांनी मासिक हप्त्यांवर बल्ब घेतले आहेत. प्रत्येकी सात वॅटचे एकूण १० बल्ब प्रत्येकी रोख १०० रुपयांना ग्राहकाला उपलब्ध होणार आहेत. यातील कमाल चार बल्बसाठी हप्त्यांची योजना असून, दहा रुपये अग्रीम भरून उर्वरित ९५ रुपये दहा हप्त्यांत देता येणार आहेत. असे आहेत बल्ब...महावितरणच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयासह जिल्ह्यातील ४२ केंद्रांवर यांची विक्री सुरू आहे. थकबाकीदार नसलेल्या वीज ग्राहकांना चालू देयकासोबत ओळखपत्र, रहिवासी पुरावा दिल्यानंतर बल्ब देण्यात येतो.या एलईडी बल्बमुळे ग्राहकांची वीज बचत होणार आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील ४२ केंद्रांवर यांची विक्री सुरू आहे. अल्प दरासह हप्त्यांवरही बल्बची विक्री करण्यात येत असल्याने नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.- शंकर शिंदे,मुख्य अभियंता, महावितरण
जिल्ह्यात महिन्याभरात चार लाख एलईडींचा प्रकाश
By admin | Published: March 28, 2016 11:53 PM