हुपरी : दिवाळी सुट्टीनिमित्ताने राजस्थानमध्ये सहल व देवदर्शनसाठी गेलेल्या हुपरीतील चांदी व्यावसायिकाच्या कारला झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये पट्टणकोडोलीतील अन्य दोघे नातेवाईकही गंभीर जखमी झाले. राजस्थानातील पाली जिल्ह्यातील केनपुरा गावाजवळ गुरुवारी रात्री हा अपघात झाला आहे. जोधपूर महामार्गावरील रस्त्याकडेच्या झाडाला धडकून नजीकच्या मोठ्या खड्ड्यात चारचाकी गाडी पडल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.बाबूराव चव्हाण (वय ५०), पत्नी सारिका बाबूराव चव्हाण (वय ३८), मुलगी साक्षी बाबूराव चव्हाण (१९) व मुलगा संस्कार बाबूराव चव्हाण (वय १७ सर्वजण रा. संभाजीराव मानेनगर, हुपरी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. गंभीर जखमी प्रमोद पुरंदर वळीवडे (वय ४०) व रवींद्र डेळेकर (वय ३२, दोघेही रा. पट्टणकोडोली) यांच्यावर जोधपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत माहिती अशी, दिवाळीनिमित्ताने सध्या चांदी व्यवसायाला सुट्टी आहे. त्यामुळे चांदी व्यावसायिक बाबूराव चव्हाण हे पत्नी सारिका, मुलगी साक्षी, मुलगा संस्कार व पट्टणकोडोलीतील चांदी व्यावसायिक प्रमोद वळीवडे, तसेच रवींद्र डेळेकर यांच्यासह मंगळवारी रेल्वेने राजस्थानला देवदर्शन व सहलीसाठी गेले होते. शिवगंजमधील सराफ व्यावसायिक किशोर प्रजापती यांची कार घेऊन हे सर्वजण जोधपूर शहर पाहण्यासाठी गेले होते.तेथील पर्यटनस्थळे पाहून रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिवगंजला परत जात होते. यावेळी प्रमोद वळीवडे हा कार चालवत होता. जोधपूर महामार्गावरील बिरामी टोल नाक्यांच्या अलीकडे एक किलोमीटर अंतरावर मोकाट गाय आडवी आल्याने तिला चुकविण्याच्या प्रयत्नात प्रमोद यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याकडील झाडावर कार जोरदार आदळली व त्यानंतर जवळच्याच मोठ्या खड्ड्यात पडली. यांमध्ये कारमधील चांदी व्यावसायिक बाबूराव चव्हाण, सारिका, साक्षी व संस्कार हे जागीच ठार झाले, तसेच चांदी व्यावसायिक प्रमोद वळीवडे व रवींद्र डेळेकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
हुपरीत हळहळ व्यक्तचांदी व्यावसायिक बाबूराव व दत्तात्रय हे दोघे भाऊ एकत्रपणे चांदीच्या व्यवसायासह इतर सर्वच कामे करायचे. चांदी दागिने तयार करून परपेठेवरील सराफांना देण्याबरोबरच त्यांचे आदमापूर (ता. भुदरगड) येथे ज्वेलर्स सुद्धा आहे. दोघे भाऊ अत्यंत प्रामाणिक व इतरांशी मिळून मिसळून वागायचे. या भावांसह कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.