तानाजी पोवारकोल्हापूर : भरधाव मोटारीने चिरडल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागातील तीन महिलांसह एकूण चौघे कर्मचारी गंभीर जखमी झाले. संभाजीनगर ते शिवाजी विद्यापीठ रिंग रोडवर आयशोलेशन हॉस्पिटलसमोर आज, शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले.विनायक लहू कांबळे (रा. सुभाषनगर), वंदना सजंय भालकर (रा. वारेवसाहत), राजाक्का विलास घेवदे (रा. भारतनगर), अर्चना अशोक सोळांकुरे (रा. बिझली चौक, जवाहरनगर) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी विनायक कांबळे याची प्रकृती अत्यावस्थ बनल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवले.याबाबत माहिती अशी की, संभाजीनगर ते शिवाजी विद्यापीठ रिंग रोड मार्गावरुन भरधाव वेगाने अलीशान मोटारकार जात असताना चालकाचा मोटारीवरील ताबा सुटला. मोटार रस्ता दुभाजकावर जोरात आदळली. यावेळी दुभाजकांवर झाडांच्या वाढलेल्या फांद्या तोडण्याचे तसेच खरमाती काढण्याचे काम करणाऱ्या चौघां कर्मचाऱ्यांना कारने चिरडले. जखमी राजाक्का घेवदे यांच्या हाताची बोटेही तुटली तर अन्य तिघांना डोक्याला व हाता, पायाला गंभीर दुखापत झाल्याने चौघानाही तातडीने खासगी वाहनातून रुग्णालयाकडे हलविले.या मार्गावर सकाळी मॉर्निंग वॉकच्या वृद्धांची मोठी गर्दी असते. अपघातानंतर नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमाशे, सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक पूर्वत सुरळीत केली.
कोल्हापूर: भरधाव कारने महापालिकेच्या चौघा कामगारांना चिरडले, एकाची प्रकृती गंभीर
By तानाजी पोवार | Published: August 06, 2022 1:05 PM