संतोष मिठारीकोल्हापूर : कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रात चार नव्या क्लस्टरची भर पडणार आहे. त्यात कॉटन फॅब्रिक, राईस मिल, सिक्युरिटी प्रिंटिंग आणि बॉक्साईट (अॅल्युमिना) क्लस्टरचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून या क्षेत्रातील उत्पादकता, गुंतवणूक आणि रोजगारवाढीसाठी हातभार लागणार आहे.कौशल्याला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देऊन उद्योगवाढीसाठी येथील उद्योजक कार्यरत आहेत. त्यांना क्लस्टरच्या माध्यमातून शासनाने मदतीचा हात दिला आहे. सध्या जिल्ह्यात पाच क्लस्टर कार्यरत आहेत.
येत्या वर्षभरात आणखी नवीन चार क्लस्टर सुरू करण्याची प्रक्रिया जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. त्यात आजरा येथे राईस मिल क्लस्टर, हातकणंगले येथे कॉटन फॅब्रिक, शिवाजी उद्यमनगर येथे सिक्युरिटी प्रिंटिंग, तर कागल तालुक्यात बॉक्साईट क्लस्टर होणार आहे. त्यातून भात आणि अॅल्युमिनियम उत्पादन, छपाई क्षेत्रातील उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, उपलब्ध होणारी नवी यंत्रसामग्री, गुुंतवणूक, आदींबाबतचा प्राथमिक स्वरूपातील आराखडा निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
त्याबाबत संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, संस्थांचा तांत्रिक सल्ला घेऊन शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. कॉटन फॅब्रिक क्लस्टर हे महिन्याभरात कार्यान्वित होईल. उर्वरित तिन्ही क्लस्टर डिसेंबर २०२० अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे ध्येय ठेवून जिल्हा उद्योग केंद्राकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
नव्या क्लस्टरमुळे काय होणार?आजरा घनसाळ हा ब्रँड अधिक सक्षम करण्याचे काम राईस मिल क्लस्टरद्वारे होणार आहे. वस्त्रोद्योगातील प्रक्रियेत नव्या तंत्रज्ञानाचा वापर कॉटन फॅब्रिक क्लस्टरमुळे होईल. विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका, पदवी प्रमाणपत्रे, विविध बँकांच्या धनादेश पुस्तिका, कंपन्यांची बिले आणि पावत्या, व्हाऊचर्स, आदींच्या बोगसगिरीला आळा घालण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारे होलोग्राम, लोगो, क्यूआर कोडसह छपाई करण्याचे काम सिक्युरिटी प्रिंटिंग क्लस्टरच्या माध्यमातून होईल.
जिल्ह्यात सापडणारे बॉक्साईट हे त्यावरील प्रक्रियेसाठी गोवा, बेळगावला पाठविले जाते. त्यावर कोल्हापूरमध्येच प्रक्रिया करून विविध स्वरूपांतील आणि नवीन उत्पादने तयार करण्याचे काम बॉक्साईट क्लस्टरद्वारे करण्याचे नियोजन आहे. या तिन्ही क्लस्टरमध्ये सुमारे १५ कोटींची गुंंतवणूक होणार आहे.
सध्याच्या क्लस्टरने उद्योगाला बळसध्या फौंड्री क्लस्टर हे गोकुळ शिरगाव, शिरोली औद्योगिक वसाहतीत कार्यान्वित असून कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, ल. क. अकिवाटे, शाहू इंडस्ट्रिअल इस्टेटद्वारे उद्योजकांना सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यासह इचलकरंजी येथे गारमेंट आणि टेक्स्टाईल, कबनूरमध्ये प्रिंटिंग, तर आजरा येथे काजू प्रक्रिया क्लस्टर सुरू आहे. त्याद्वारे उद्योगांना बळ देण्याचे काम होत आहे.
जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राची वाढ वेगाने झाली आहे. सन २००५ मध्ये ५२०० इतकी उद्योगांची संख्या होती. सध्या ती ५२००० हून अधिक झाली आहे. अनेक उद्योजकांना वैयक्तिकरीत्या अद्ययावत तंत्रज्ञान, सुविधा निर्माण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. अशा वेळी ३० ते ४० उद्योजकांना एकत्रित करून त्यांच्यासाठी क्लस्टरच्या माध्यमातून कॉमन फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यासाठी शासन पाठबळ देत आहे. नव्या क्लस्टरमुळे संबंधित उद्योगक्षेत्रातील उत्पादकता, गुंतवणूक आणि रोजगारवाढीला हातभार लागणार आहे.- सतीश शेळके, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र.