म्हाकवे : बस्तवडे (ता. कागल) येथील वेदगंगा नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या मुलाला वाचविताना चार जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये मामा, माय-लेकरांसह चौघांचा समावेश आहे. तिघांचे मृतदेह सापडले असून, एका युवकाचा शोध सुरू आहे. जितेंद्र विलास लोकरे, रेश्मा दिलीप येळमल्ले, सविता अमर कांबळे यांचे मृतदेह सापडले असून, हर्षद दिलीप येळमल्ले याचा शोध सुरू आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आणूर येथे बुधवारी यात्रेसाठी गुरूदास लोकरे यांच्या घरी नातेवाईक आले होते. यापैकी शुक्रवारी दुपारी ३ वाजता वेदगंगा नदीकाठावर बस्तवडे बंधाऱ्यानजीक जितेंद्र विलास लोकरे (वय ३६, रा. मुरगूड, ता. कागल), साधना जितेंद्र लोकरे (वय ३०, रा. मुरगूड, ता. कागल), रेश्मा दिलीप येळमल्ले (वय ३४, रा. अथणी, ता. चिक्कोडी), हर्षद दिलीप येळमल्ले (वय १७, रा. अथणी, ता. चिक्कोडी), सविता अमर कांबळे (वय २७, रा. रुकडी, ता. हातकणंगले) हे कपडे धुण्यासाठी तसेच आंघोळीसाठी नदीत उतरले होते. यातील हर्षद हा खोल पाण्यात बुडत असल्याने त्याने आरडाओरडा केला. यावेळी शेजारीच असणारा त्याचा मामा जितेंद्र हा पाण्यात उतरला आणि त्याच्या पाठोपाठ रेश्मा, साधना व सविताही उतरल्या. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि भीतीपोटी एकमेकांना सर्वांनीच घट मिट्टी मारल्याने ते नदीत बुडाले.
नदीच्या काठावर आरोही जितेंद्र लोकरे (वय १२) या चिमुकलीने या सर्वांना बुडत असताना पाहिले. ती जोरात आरडाओरडा करत होती. यावेळी नदीकाठावर मासे पकडण्यासाठी आलेल्या बस्तवडे येथील अवधूत वांगळे यांनी गावातीलच प्रमोद पाटील याला बोलावून प्रसंगावधान राखत नदीत उड्या घेतल्या. त्यांना साधना लोकरे यांना वाचविण्यात यश आले. तसेच त्यांनी हर्ष वगळता तिघांचे मृतदेह नदीकाठावर आणले.अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक करे, कागलचे पोलिस अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा केला. कागल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. माजी आमदार संजय घाटगे, आणूरचे सरपंच काकासाहेब सावडकर, पोलिस पाटील स्वाती कांबळे, बस्तवडेच्या जयश्री साताप्पा कांबळे घटनास्थळी उपस्थित होत्या. दरम्यान, हर्षदचा मृतदेह सापडला नसल्याने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.
वेदगंगा नदीकाठावर नातेवाईकांचा आक्रोश..घटनेचे वृत्त समजताच आणूर, बस्तवडे, सोनगे, म्हाकवे, बानगे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तर नातेवाईकांनी मृतदेह पाहून आक्रोश केला.
आरोहीचे पितृछत्र हरपले, आई बचावली..आरोही ही काठावर उभी होती. तिच्या डोळ्यांसमोरच वडील, आत्या व आतेभाऊ यांचा बुडून अंत झाला, तर सुदैवाने आई बचावली. तिने आपला चुलता मारुती लोकरे याला फोन करून घटनेची माहिती दिली.
त्या घटनेच्या आठवणी ताज्या..२ डिसेंबर २०१७ रोजी मध्यरात्री बस्तवडे बंधाऱ्यानजीकच असणाऱ्या खणीत सात जणांना जलसमाधी मिळाली होती. तर गतवर्षी सोनगे येथील धुणे धुण्यासाठी आलेले संजय तोरसे यांचा या बंधाऱ्यानजीकच बुडून मृत्यू झाला होता. याचीही घटनास्थळी चर्चा सुरू होती.
पालकमंत्री मुश्रीफ यांच्या सूचनापरदेश दौऱ्यावर स्पेनमध्ये असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना बस्तवडे येथील घटनेचे वृत्त समजताच त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी अमोल येडगे व तहसीलदार अमरदिप वाकडे यांच्याशी संपर्क साधला. हर्षदच्या शोध कार्यासाठी तातडीने आपत्ती व्यवस्थापनाची रेस्क्यू टीम नदीकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या. तसेच, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून या सर्व मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचनाही मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या.