कोल्हापूर : गरीब असहाय पीडितांना वेश्याव्यवसायासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी न्यायालयाने चौघांना बुधवारी दोषी ठरवले. यात दोघा महिलांचाही समावेश आहे. तिघांना दहा तर एकास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.सरिता रणजित पाटील (वय ४१, रा. पाचगाव, करवीर), विवेक शंकर दिंडे (वय ३१, रा. राजारामपुरी), मनीषा प्रकाश कट्टे (वय ३०, रा. भोसलेवाडी परिसर) या तिघांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि २९ हजार रुपये दंड तर वैभव सतीश तावसकर (वय २८, रा. पांगरी, ता. बार्शी, सोलापूर) याला दोन वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. मंजूषा पाटील यांनी काम पाहिले.कळंबा परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये अनैतिक देह व्यापार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी येथे छापा टाकला होता. यात दोघा पीडितांची सुटका करण्यात आली होती. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी केला. या खटल्याची जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक १) एस. आर. पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.सरकार पक्षातर्फे ॲड. मंजूषा पाटील यांनी अकरा साक्षीदार तपासले. दोन पीडित मुलींची, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर चौघा संशयितांना दोषी ठरवले. सरकार पक्षाला पोलीस अंमलदार सागर पोवार, महिला पोलीस कर्मचारी माधवी घोडके, समाजसेवी संस्थेच्या ॲड. वंदना चिवटे यांचे कामकाजात साहाय्य झाले.
वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांना सक्तमजुरी, दोन महिलांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 6:29 PM