शाहूवाडी तालुक्यातील सरूड , बांबवडे , करंजफेण व शित्तूर वारुण येथील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना लवकरच नवीन रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याची माहिती जि. प. चे बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या १४ व्या वित्त आयोगातून कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ३९ रुग्णवाहिका मंजूर झाल्या आहेत. यातील चार रुग्णवाहिका सरूड , बांबवडे , करंजफेण , शित्तूरवारूण या चार आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहेत. २२ जानेवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यानंतर या सर्व रुग्णवाहिका संबंधित आरोग्य केंद्राकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
चौकट...........
तालुक्यातील ३८ उपकेंद्रांत समुदाय वैद्यकीय अधिकांऱ्याच्या नेमणूका
शाहूवाडी तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या ३८ उपकेंद्रांमध्ये आयुष्यमान भारत कार्यक्रमातंर्गत ३८ समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. उपकेंद्रातंर्गत रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने घरभेटी देणे, रुग्ण तपासणी व प्रथमोपचार करणे, आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे व सर्व आरोग्य योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे आदी काम संबंधित समुदाय वैद्यकीय अधिकारी करणार आहेत. त्यामुळे उपकेंद्रातंर्गत रुग्णांची होणारी गैरसोय यापुढे दूर होणार असल्याचेही बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती हंबीरराव पाटील यांनी यावेळी सांगितले.