कोल्हापूर : कळंबा कारागृहातील आयटीआयनजीकच्या आपत्कालीन कारागृहातून पलायन केलेल्या दोघा कैद्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके शहराची उपनगरे तसेच पाचगावचा परिसर पिंजून काढत आहेत. त्यांचा ठावठिकाणा शोधासाठी मित्र, नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली जात आहे. प्रतीक सुहास सरनाईक (वय ३० रा. आर. के.नगर, पाचगाव रोड, साई कॉलनी, कोल्हापूर) व गुंडाजी तानाजी नंदीवाले (२८, रा. तमदलगे, ता. शिरोळ) अशी पलायन केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. दोघेही आरोपी हे न्यायालयीन बंदी होते.
कळंबा कारागृहातील कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी कारागृह प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे. कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याने तेथील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी काही कैदी पॅरोल रजेवर बाहेर आले आहेत. तरीही कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झालाच. या कोरोनाबाधित कैद्यांना उपचारासाठी आपत्कालीन कारागृहातील कोविड सेंटरमध्ये विशेष व्यवस्था केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील कोविड सेंटरच्या हॉलमध्ये एकूण १७ कैद्यांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. गुरुवारी (दि. १३) मध्यरात्रीच्या सुमारास सर्व कैदी झोपले होते. त्यावेळी दरोड्याच्या गुन्ह्यातील गुंडाजी नंदीवाले व पाचगाव-जरगनगर मार्गावरील खूनप्रकरणातील प्रतीक सरनाईक या दोघांनी कारागृहाच्या खिडकीचे गज वाकवून सुमारे १५ फूट उंचीवरून उड्या टाकून पलायन केेेले. रक्षकासह पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला; पण ते पलायन करण्यात यशस्वी झाले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण, जुना राजवाडा पोलिसांनी कैद्यांच्या शोधासाठी शहराच्या उपनगरांचा भाग, छोटी-छोटी गावे रात्रभर पिंजून काढली; पण कैदी हाती लागले नाहीत.
त्यांच्या शोधासाठी एकूण चार पथके तयार करून ती पलायन केेलेल्या दोन्हीही कैद्यांच्या घरी, संबंधित मित्र, नातेवाईक यांच्याकडे चौकशी करून शोधाशोध करीत आहेत.
पाचगावातून आरोपींना मदतीची शक्यता
पाचगाव भागात गुंडांच्या टोळ्या आजही सक्रिय आहेत. पलायन केलेल्या कैद्यांना पाचगावमधील टोळ्यांतील काही गुंडांचे सहकार्य, मदत मिळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी गुंडांच्या घराचे झडतीसत्र अवलंबले आहे. संबंधित कैद्यांबाबत माहिती असल्यास जुना राजवाडा पोलीस अथवा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला फोनवरून माहिती द्यावी. माहीतगारांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहन पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी केले आहे.