कोल्हापूर -विद्या मंदिर, हिरवडे खालसा शाळेच्या निकृष्ट दर्जाच्या पत्र्याच्या शेडवरून पडून चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्याध्यापकांच्या बेजबाबदारपणा व हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप पालकांनी केला आहे.करवीर तालुक्यातील विद्या मंदिर, हिरवडे खालसा शाळेत हे विद्यार्थी इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापकांनी या विद्यार्थ्यांना शाळेच्या पत्र्याच्या शेड वरती चढवून पाण्याची टाकी बंद करण्यास सांगितले होते. निकृष्ट दर्जाच्या त्या शेडचे पत्रे अचानक तुटुन ही दोन्ही मुलं खाली पडली. त्यांना गंभीर इजा झाली आहे.
यातील दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील उत्तम पाटील याच्या पायाला ९ टाके पडून मोठी जखम झाली आहे, तर प्रेम दीपक पाटील याचा पाय फ्रॅक्चर होऊन डोक्याला गंभीर इजा झाली आहे. दरम्यान, यावर देखरेख करणाऱ्या संबधित शिक्षकानेही त्यांची जबाबदारी घेतली नाही. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांना रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुख्याध्यापकांच्या बेजबाबदारपणा व हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप पालकांनी केला आहे.