मुरगूड : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीमुळे मुरगूड ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. सुमारे तीन हजार सातशे जणांना लस दिली असून, काही दिवसांपासून शहरात मात्र कोरोना रुग्णांची दररोज नव्याने भर पडत आहे. सध्या दोन दिवस पुरेल इतकी लस उपलब्ध आहे. तीन दिवसांत दहापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे प्रशासन कोरोना प्रतिबंधासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. नागरिकानी मोठ्या प्रमाणात लस घ्यावी यासाठी घरोघरी जाऊन आवाहन व प्रबोधन करण्यात येत आहे.
मुरगूड शहरात एकूण आजपर्यंत सुमारे २०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील तेराजणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आजही ना मास्क - ना सोशल डिस्टन्सिंग अथवा नो कंटेन्मेंट झोन अथवा ना कोणतीही भीती अशी शहरात बेडरपणाची स्थिती आहे. आजच्या परिस्थितीत शहरात कोरोनाबाबत नागरिक व प्रशासन अशा दोन्हीही बाजूंनी कोणतेही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यात नवीन घातलेल्या नियमांनुसार व्यापारी आपले व्यवसाय बंद करण्याच्या मानसिकतेत नाहीत; त्यामुळे प्रशासनासमोरची डोकेदुखी वाढलेली आहे.
सुमारे एक महिन्यांपूर्वी कोरोना रुग्ण सापडला होता. त्यानंतर काही दिवसांपासून शहरातील गर्दीच्या ठिकाणी पुन्हा रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. याशिवाय शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्येही रुग्ण सापडू लागलेत. मुरगूड हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या बाजारपेठेत परिसरातील अनेक गावांमधून लोकांची ये-जा असते. याचबरोबर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने लादलेले कडक निर्बंधही नागरिक मानण्यास तयार नाहीत; त्यामुळे भविष्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.
मुरगूड नगरपरिषदेअंतर्गत मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे तेरा हजार लोकसंख्या आहे. आजअखेर २९७४ जणांना लसीकरण झाले आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या माहितीनुसार ६० वर्षांवरील लसीकरणास पात्र १५०० जण असून ४५ ते ६० वर्षातील लसीकरणास पात्र १८४१ जण आहेत. शहरातील सर्व शाळेतील शिक्षक, सरकारी कर्मचारी, नगरसेवक, पोलीस यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या दोन दिवस पुरेल इतके म्हणजे २५० डोसेस लस उपलब्ध आहे; पण आपण मागणी केली असून लस आपल्याला उपलब्ध होईल. शिवाय ग्रामीण रुग्णालयाचे ३५०० लसींचे उद्दिष्ट होते, ते पूर्ण केले असून जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी सांगितले.