कोल्हापूर : वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. याअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक अशा एकूण ४३६३ शाळा दि. १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. त्याठिकाणी ऑफलाईन वर्ग बंद राहणार असून पुन्हा ऑनलाईन शिक्षण आज, सोमवारपासून सुरू होणार आहे.
कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने गेल्या आठवड्यात मुंबई पाठोपाठ पुणे, ठाणे, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय तेथील प्रशासनाने घेतला. राज्य शासनाने शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस दि. १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. या शासन निर्णयाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यातही होणार आहे. शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार शाळांबाबत कार्यवाही करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने गेल्यावर्षी जुलैपासून टप्प्याटप्याने ऑफलाईन स्वरूपात शाळा, महाविद्यालयातील वर्ग सुरू झाले. त्यातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग दि. १ डिसेंबरपासून भरले होते. शिक्षण गती घेत असतानाच आता पुन्हा सोमवारपासून शाळांमधील ऑनलाईन वर्ग सुरू होणार आहेत. कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये समूह अध्यापन सुरू असणार आहे.
दहावी, बारावीचे उपक्रम सुरू
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून राबविण्यात येणारे उपक्रम सुरू राहतील. प्रशासकीय आणि शिक्षकांचे अध्यापनाव्यतिरिक्त कामकाज सुरू राहणार आहे. त्याला शासनाने निर्बंधातून वगळले आहे.
आकडेवारी दृष्टीक्षेपात
महापालिका शाळा : २९५
विद्यार्थी संख्या : १ लाख ९ हजार ६००
प्राथमिक शाळा (सर्व माध्यम) : ३ हजार
विद्यार्थी संख्या : ४ लाख ५० हजार
माध्यमिक शाळा : १०६८
विद्यार्थी संख्या : ३ लाख ५० हजार