कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गुरुवारी चार फ्लेवरमध्ये सुगंधी दुधाचे लाँचिंग माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह अध्यक्ष व संचालकांच्या हस्ते केले. गोकुळच्या येथील कार्यालयात कार्यक्रम झाला.आमदार पाटील म्हणाले, गोकुळने आता लाँचिंग केलेले सुगंधी दूध १८० दिवस टिकणार आहे. पुढील काळात दुधाच्या सह उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. ही बाजारपेठ मिळवून देशात गोकुळ दबदबा निर्माण करेल.मुश्रीफ म्हणाले, स्ट्रॉबेरी, पिस्ता, व्हेनिला व चॉकलेट या चार प्रकारांमध्ये गोकुळने सुगंधित दूध उपलब्ध केले आहे. येत्या काळात मसाला ताक, मँगो लस्सी व व्हेनिला लस्सी टेट्रापॅकमध्ये देण्याचे नियोजन आहे. फ्लेवर दूध उच्च दर्जाच्या व नैसर्गिक दुधापासून तयार केले आहे.गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी नवीन उत्पादनासंबंधी माहिती दिली. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, बोर्ड सचिव प्रदीप पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एम. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक शशीकांत पाटील - चुयेकर यांनी आभार मानले.‘गोकुळ’ने बंद पडलेले दूध संघ घ्यावेतआमदार मुश्रीफ म्हणाले, राज्यातील बंद पडलेले दूध संघ घेऊन ते गोकुळने चालवले पाहिजेत. भविष्यात संघाने गायीच्या दुधापासून उपपदार्थ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करावे. सरकारने शालेय पोषण आहारात आदिवासी भागात टेट्रापॅकमध्ये दूध देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रोज लागणाऱ्या ३० ते ४० हजार लिटर दूध गोकुळने पुरवठा करण्याची तयारी करावी.
बाजारपेठेत ‘गोकुळ’चे नवे उत्पादन, चार प्रकारच्या सुगंधी दुधाचा प्रारंभ; आमदार मुश्रीफ म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 5:48 PM