लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दुचाकीवर चारचाकी गाडीचा क्रमांक लावून फिरणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीवेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. नोंदणी न करता फिरवली जात असलेली दुचाकी यावेळी पोलिसांनी जप्त केली.
चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने नाकाबंदी केली जाते. मंगळवारी (दि. २) रात्री संभाजीनगर परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी एका दुचाकीस्वाराला पोलिसांनी अडवून कागदपत्रांची मागणी केली. ती नसल्याने गाडी जप्त करण्यात आली व दुसऱ्या दिवशी कागदपत्रे दाखवून गाडी देण्याची सूचना पोलिसांनी केली. दरम्यान, बुधवारी या नंबरप्लेटची पोलिसांनी पाहणी केली असता हा क्रमांक दुचाकीचा नसून चारचाकी गाडीचा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच दुचाकी बीएस ४ ची असून ही नोंदणी आता प्रादेशिक परिवहन खात्याकडून केली जात नसल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली.
सोबत दुचाकीचा फोटो
कुंटणखान्यावर छापा, तिघांविरोधात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वडणगेजवळील गुडलक लाॅजिंगवर पोलिसांनी बुधवारी छापा टाकला. वेश्या व्यवसायाच्या आरोपावरून करवीर पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हाॅटेलवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दुपारी छापा टाकला असता या ठिकाणी पीडित महिलेसह अन्य व्यक्ती आढळुन आल्या. अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या मुख्य हवालदार सायली कुलकर्णी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार हाॅटेल चालक सरदार पाटील (रा. आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा), व्यवस्थापक अमित नांगरे (साळोखेनगर कळंबा) आणि कुंटणखाना एजंट युवराज जाधव (रा. खोतवाडी, ता. पन्हाळा) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी पांढऱ्या रंगाची ॲक्टिव्हा, २ मोबाईल, पंटरने दिलेली १५०० रुपयांची रक्कम असा ४५ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पुढील तपास करत आहेत.