कागल : येथील कागल - कसबा सांगाव रस्त्यावरील माळावर आयोजित बैलगाडी व घोडा शर्यतीदरम्यान घोडेस्वारांच्या पुढे भरधाव वेगात जात असलेली चारचाकी गाडी एका वळणावर उलटली. गाडीचा वेग, लाल मातीचा रस्ता आणि शर्यतीचा थरार यामुळे चालकाला वळण घेताना अंदाज आला नाही. हा अपघात दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला. दोघांना किरकोळ मार लागला आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेबद्दलची नोंद कागल पोलिसांत झालेली नव्हती.येथील शर्यतप्रेमी ग्रुपच्या वतीने म्हसोबा यात्रेनिमित्त या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जनरल बैलगाडी शर्यतीस प्रथम क्रमांकासाठी मोटारसायकल भेट होती. बैलगाडी, घोडागाडी आणि सुट्टा घोडा व त्यामध्येही गट होते. कागल शहरात पूर्वीप्रमाणे शर्यत मार्ग शिल्लक राहिलेला नाही. पण शर्यतप्रेमींचा उत्साह कायम आहे. त्यातून वळणदार पद्धतीने मार्ग तयार केला आहे. अपघात झालेली चारचाकी शर्यतीच्या पुढे धावत होती. या गाडीच्या टपावर व टपाला धरून शौकीन उभे होते. वळणावर गाडी उलटल्यावर हे सर्व बाजूला फेकले गेले. शर्यत पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी धाव घेत गाडी उचलून सरळ केली व चालकासह अन्य दोघांना बाहेर काढले. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले.
Kolhapur: कागल येथे बैलगाडीच्या शर्यतीत चारचाकी उलटली, दोघे किरकोळ जखमी -video
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 11:50 AM