कागल : येथील संत रोहिदास चौकात राहणाऱ्या अनिस गवंडी यांचा चार वर्षांचा नाज हा मुलगा सकाळी आठच्या सुमारास गायब झाला. शोधाशोध सुरू झाली. हा पट्ट्या चक्क कागल बसस्थानकात गेला. तेथून बिद्रीला जाणाºया एस. टी.त बसला आणि परत त्याच बसमधून साडेअकराच्या सुमारास शेंडूर येथे उतरला. तोपर्यंत आई-वडिलांनी मुलगा हरविल्याची तक्रार कागल पोलिसांत दिली होती. मात्र, शेंडूर येथील चार युवकांनी त्याला घेऊन कागल पोलीस ठाणे गाठले आणि हे बालक सुखरूप घरी परतले.
सजगवृत्तीने त्याला कागल पोलिसांकडे आणणाऱ्या विश्वजित घाटगे (वंदूर), निखिल निंबाळकर, सचिन माने, राहुल मगदूम (शेंडूर) यांचा सोमवारी गवंडी कुटुंबीयांनी पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्या हस्ते सत्कार केला.शेंडूरमध्ये उतरलेला एक-दोन प्रवासी निघून गेल्यावर नाज कावराबावरा होऊन थांबला होता. तेव्हा तेथे असणाऱ्या या चार युवकांना शंका आली. त्यांनी त्याला प्रथम शेंडूर गावात फिरविले. पत्ता सांगता येत नसल्याने त्याला कागल पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्यात वडिलांनी त्याच्या गायब होण्याची तक्रार दिली होती. त्यामुळे तो सुखरूप घरी पोहोचला, पण सकाळी साडेआठपासून दुपारी एकपर्यंत गवंडी कुटुंबीय फार मोठी अस्वस्थता अनुभवत होते. ती क्षणात दूर झाली.पोलिसांनी तपास करण्याची गरज !जरी हे बालक सुखरूप मिळाले असले तरी त्याचे वय पाहता ते एकटे चालत येणे, एस. टी.त बसणे, वाहकाच्या लक्षात न येणे? अनेक बस थांबे असताना तेथे न उतरणे? शेंडूरमध्येच उतरणे? यातून हे बालक कोणाच्या तरी पाठोपाठ तरी गेले नसेल ना? यादृष्टीने तपास करण्याची गरज आहे.बालकाची वेळ चांगली !संत रोहिदास चौक ते कागल बसस्थानकापर्यंत हे बालक एकटेच चालत गेले. तेथून बिद्रीला जाणाºया एस. टी.त बसले.चुकून कर्नाटक एस. टी.त अथवा पुणे-मुंबईला जाणाºया एस. टी.त बसले असते तर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला असता.शेंडूरमध्ये उतरल्यानंतर ते हे चार युवक होते. एकूणच या बालकाची आणि आमची वेळ चांगली होती. अशी कुटुंबाची प्रतिक्रिया उमटली.