वाठार स्टेशन : सातारा-लोणंद या प्रमुख राज्यमार्गावर वाठार स्टेशन येथे चार वर्षांपूर्वी ३४ लाख खर्च करून बांधलेले सुसज्य बसस्थानक उद्घाटनानंतरही बंद होते. बसस्थानक सुरू व्हावी, अशी अनेक प्रवाशांची मागणी असतानाही गावच्या राजकारणामुळे हे बसस्थानक बंद होते. आमदार दीपक चव्हाण यांनी विशेष लक्ष घातल्याने आता हे नवीन बसस्थानक सुरू झाले आहे. ब्रिटिीशकाळापासूनच रेल्वेच्या हद्दीत छोट्या जागेत असलेल्या एसटी बसस्थानकात प्रवाशांना मूलभूत सोयी उपलब्ध नसल्याने तसेच रेल्वे गेट, वडाप व अरुंद रस्त्यामुळे सातारा-लोणंद राज्यमार्गावर नवीन बसस्थानकाचा प्रस्ताव गावातील काही ग्रामस्थांनी दिला होता. एसटी व रेल्वे बसस्थानकामुळेच येथील व्यावसायिकांना रोजगार मिळत असल्याने हे बसस्थानक बंद करूनये, असा प्रस्ताव काही व्यापारी बांधवांनी दिल्याने वाठार स्टेशनच्या नव्या बसस्थानकाचा वाद न्यायालयात गेला. यावर मुंबई उच्च न्यायालयाने नवीन बसस्थानक हे सातारा-लोणंद मार्गावर तत्काळ बांधण्याचा आदेश एसटीला दिला. यानंतर महामंडळाने या ठिकाणी नवीन सुसज्य बसस्थानक उभारले. बसस्थानक पूर्ण झाल्यानंतर या उद्घाटनास सरपंचानाच निमंत्रण न दिल्याने सरपंचांनी तत्कालीन विभाग नियंत्रक अनंत मुंडीवाले यांच्या गाडीच्या काचा फोडत विरोध केला. यानंतर पुन्हा या बसस्थानकाचे उद्घाटन वाठार स्टेशनच्या सरपंचांच्याच हस्ते झाले; परंतु यावेळी हे बसस्थानक सुरू करा; जुने बसस्थानक कायम चालू ठेवावे, असा इशाराही दिला.त्यानंतर काही दिवस हे बसस्थानक सुरू झाले; मात्र चालक स्थानकात जाण्यास कंटाळा करूलागल्याने हे बसस्थानक बंद पडले. आमदार दीपक चव्हाण यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन हे नवीन बसस्थानक सुरू करण्याबाबत निवेदन दिले. त्यानंतर नव्या बसस्थानकाचा मार्ग मोकळा झाला. (वार्ताहर)दोन्ही ठिकाणी नियंत्रकाची मागणीबसस्थानकात कोरेगाव,सातारा, फलटण, पारगाव-खंडाळा, वाई या आगाराच्या पन्नास बसेस दररोज ये-जा करत आहेत. मात्र, या बसस्थानकाबाबत अजूनही प्रवाशांची विश्वासार्हता नसल्याने प्रवासी थांबत थांबत नाहीत. नवीन बसस्थानकाबरोबरच जुन्या बसस्थानकात एसटीने रेल्वे कडून जागा घेऊन मूलभूत सोयी पुरवाव्यात व दोन्ही बसस्थानकात स्वतंत्र वाहतूक नियंत्रक करावा. नवीन बसस्थानकात सध्या केवळ सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत तात्पुरता वाहतूक नियंत्रक असून, या ठिकाणी सायंकाळी सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
चार वर्षांनी नव्या स्थानकात बस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2015 10:39 PM