कोल्हापूर : भारतात महिलांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचारांची चर्चा नेहमीच होत असते; पण हा देश महिलांसाठी तितकाच सुरक्षितही आहे, हा संदेश जगापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लेडीज आॅफ हर्ले’अंतर्गत सात महिलांनी देशातील राष्ट्रीय महामार्गांवरून दुचाकीवरून सहा हजार किलोमीटरचा प्रवास सुरू केला आहे. ही भ्रमंती १४ दिवसांची असून, त्यांचे गुरुवारी कोल्हापुरात भव्य स्वागत झाले.हर्ले डेव्हिडसन चालविणाऱ्या व्यक्तींचा हर्ले ओनर्स ग्रुप असून, यातील ‘लेडीज आॅफ हर्ले’ हा साहसी उपक्रम करणाºया महिलांचा मोटारसायकल रायडिंग ग्रुप आहे.यातील सुनीला कुंजीर (पुणे), सुनीता मांडे (मुंबई), शर्ली जॉर्ज, प्रवेशिका कटियार, कृपा रेड्डी (बंगलोर), उर्वशी देसाई (अहमदाबाद), अनुश्रीया गुलाटी (डेहराडून) या सात महिला रायडर्सनी ‘महिलांसाठी भारत सुरक्षित आहे,’ हा संदेश घेऊन ८ तारखेला राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून प्रवास सुरू केला.दमण, उदयपूर, दिल्ली, कोलकाता, ओडिसा, चेन्नई, बंगलोर असा प्रवास करीत गुरुवारी त्या कोल्हापुरात आल्या. कोल्हापुरातील ‘वॉरिअर हॉग चॅप्टर’च्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सुनीता मांडे व सुनीता कुंजीर यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, भारत महिलांसाठी असुरक्षित आहे, येथे महिलांवर अन्याय-अत्याचार होतात, या वाईट गोष्टी नेहमीच जगासमोर मांडल्या जातात. हे वास्तव असले तरी तितकेच सुरक्षितही वातावरण आहे, ही चांगली बाजू आम्हाला प्रकाशात आणायची होती. त्यासाठी आम्ही रोज दिवस-रात्र असा सहाशे किलोमीटरचा प्रवास करीत आहोत.या कालावधीत आम्हाला नागरिकांचा खूप चांगला अनुभव आला. लोक आमची खूप आस्थेने विचारपूस करायचे. आमच्यात कुठेही असुरक्षिततेची भावना नव्हती. इथून पुढे आम्ही मुंबईला जाऊन पुन्हा दमण येथे या राईडची सांगता करणार आहोत.दुचाकीवरून भारतभ्रमंतीला निघालेल्या ‘लेडीज आॅफ हर्ले ग्रुप’च्या महिलांचे गुरुवारी कोल्हापुरात स्वागत करण्यात आले.
चौदा दिवसांत सहा हजार कि.मी.चा प्रवास, ‘महिला सुरक्षे’चा संदेश देणार-दुचाकीवरून सात महिलांची देशभर भ्रमंती :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:37 AM