राधानगरी : जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असताना गर्दी व मारामारीच्या गुन्ह्यात परस्पर विरोधी फिर्यादी देऊन अडकलेल्या मौजे कासारवाडा (ता. राधानगरी) येथील दोन्ही गटांच्या चौदाजणांना एक वर्षाचा तुरुंगवास व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा येथील दिवाणी व सत्र न्यायाधीश अभिजित अत्रे यांनी सुनावली आहे. या शिक्षेत दोन्ही गटांच्या पाच महिलांचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ३१ डिसेंबर २००० रोजी सार्वजनिक गटारीत बसवलेला नळ काढताना पांडुरंग दौलू पाडळकर यांनी विरोध केला म्हणून आरोपी रंगराव विठ्ठल पाडळकर, सुनील विठ्ठल पाडळकर, शरद दिनकर पाडळकर यांनी फिर्यादी पांडुरंग पाडळकर यांना काठ्या, कुºहाडीने मारहाण केली, तर सुनील दिनकर पाडळकर याने बंदुकीने ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पांडुरंग पाडळकर यांनी दिली होती. म्हणून आरोपीसह विश्वास विठ्ठल पाडळकर, सुनीता सुनील पाडळकर, लक्ष्मीबाई दिनकर पाडळकर व सुनंदा विश्वास पाडळकर यांच्यावर राधानगरी पोलिसांत फिर्याद दिली. याचवेळी प्रति फिर्यादी म्हणून पांडुरंग पाडळकर यांच्यासह त्यांच्या गटातील एकनाथ दौलू पाडळकर, जयवंत विष्णू पाडळकर, राजेंद्र पांडुरंग पाडळकर, इंदुबाई पांडुरंग पाडळकर, विजय विष्णू पाडळकर व भारती एकनाथ पाडळकर यांच्या विरोधात परस्पर विरोधी फिर्याद दिली होती. दरम्यान, यांच्यात १९६४ पासून भाऊबंदकी, राजकीय, जमिनीच्या वादातील दावे एकमेकांवर आहेत. यात काही निकाली व प्रलंबित असताना हा वाद झाला होता. या प्रकरणी १४ वर्षे सुनावणी सुरू होती. दिवाणी व सत्र न्यायाधीश अभिजित अत्रे यांनी मुंबई अधिनियमांतर्गत दोन्ही गटाला प्रत्येकी एक हजार, तर दोन्ही गटाच्या चौदा आरोपींना वेगवेगळ्या कलमांत प्रत्येकी इंडियन पिनल कोड १४३ नुसार १ हजार दंड, १५ दिवस साधी कैद, तर १४८ नुसार दोन हजार दंड, ६ महिने तुरुंगवास, ३२३ नुसार ६ महिने तुरुंगवास, एक हजार दंड, तर ३२४ मध्ये एक वर्षाची शिक्षा, एक हजार दंड, ५०४ मध्ये ६ महिने शिक्षा, एक हजार दंड, ५०६ मध्ये सहा महिने शिक्षा व १ हजार दंड अशी दोन्ही गटाला प्रत्येकी ५० हजार व सर्वांत मोठी एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. या दंडातील एकूण रकमेपैकी प्रत्येकी २५ हजार रुपये नुकसानभरपाई दोन्ही गटाच्या फिर्यांदीना देण्याचा निकाल देण्यात आला आहे. या न्यायालयीन कामात शरद पाडळकर यांच्यावतीने अॅड़ प्रशांत देसाई, पांडुरंग दौलू पाडळकर यांच्यावतीने अॅड़ ए. आर. पाटील, तर सरकारी वकील म्हणून अॅड़ के. एस. भोसले यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
चौदाजणांना तुरुंगवास कासारवाड्यातील जमावबंदी आदेश भंगप्रकरण : प्रत्येकी ५० हजार दंड; पाच महिलांचा समावेश
By admin | Published: May 16, 2014 12:40 AM