कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडवर गंधर्वनगरी कमानीजवळ भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघातात १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. लक्ष्मण धुळू डोईफोडे (वय १४, रा. श्री कृष्ण कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) असे मृत मुलाचे नाव आहे. लक्ष्मण हा हट्टाने वडिलांची दुचाकी घेऊन दूध आणण्यासाठी निघाला होता. शनिवारी (दि. ३१) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला.
मूळचे राधानगरी तालुक्यातील ऐणी येथील धुळू डोईफोडे हे मोलमजुरी करतात, तर त्यांची पत्नी धुणी-भांडी करून कुटुंबाला हातभार लावते. डोईफोडे दाम्पत्याने खूप परिश्रमातून फुलेवाडी रिंगरोड येथील श्रीकृष्ण कॉलनीत प्लॉट घेतला असून, सध्या घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामावरील कामगारांना चहा करायचा होता. लक्ष्मण हट्टाने दुचाकी घेऊन दूध आणण्यासाठी गेला. त्यावेळी गंधर्वनगरी कमानीजवळ समोरून उलट्या दिशेने आलेल्या भरधाव दुचाकीने लक्ष्मणच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेतून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मृत लक्ष्मण याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. याच अपघातातील दुसऱ्या दुचाकीस्वाराला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. मात्र प्रथमोपचार घेतल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देताच तो खासगी रुग्णालयात गेला. तोही अल्पवयीन असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, त्याचा शोध सुरू आहे. या अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.
हट्टापायी गेला जीवदूध आणण्यासाठी चालत जा असे वडील सांगत होते. मात्र लक्ष्मण हट्टाने दुचाकी घेऊन गेला आणि जिवाला मुकला. तो मीनाताई ठाकरे विद्यालयात आठवीत शिकत होता. अनेक घरांमध्ये अल्पवयीन मुले पालकांकडे दुचाकींसाठी हट्ट धरतात. मात्र तो हट्टच जीवघेणा ठरतो.
परिसर हळहळलाकोवळ्या मुलाच्या अपघाती मृत्यूने फुलेवाडी रिंगरोड परिसरातील नागरिक हळहळले. अपघाताची माहिती मिळताच लक्ष्मणचे आई-वडील आणि नातेवाइकांनी सीपीआरच्या अपघात विभागाकडे धाव घेऊन हंबरडा फोडला.